आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:महाज्योतीचे 10 हजार टॅब अडकले आचारसंहितेत; वर्षभरापासून प्रतीक्षाच

किशाेर वाघ | नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाज्योतीद्वारे जेईई, नीट आणि एमएचटीसीइटी या परीक्षा देणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रशिक्षण आणि अभ्यासासाठी देण्यात येणारे ‘टॅब’ वर्ष संपत आले तरीही अद्याप वितरणाच्या प्रतीक्षेत आहे. दिवाळीनतंर टॅब वितरण निश्चित झाले असताना ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन अन् आता पुन्हा पदवीधर निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करून या योजनेची अंमलबजावणी थांबविण्यात आली आहे.

फेब्रुवारी-मार्च महिन्यात परीक्षा असलेल्या विद्यार्थ्यांना याच महिन्यात एेन परीक्षेवेळी टॅब हाती पडल्यानंतर त्याचा काय उपयोग होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत महाज्योतिचे व्यवस्थापकीय संचालक डांगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर अोबीसी विद्यार्थ्यांसाठी स्थापलेल्या महाज्योती संस्थेद्वारे अोबींसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील होतकरू, गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी, आॅनलाइन अभ्यासासाठी टॅब आणि दररोज ६ जीबी इंटरनेट देण्याची योजना सुरू करण्यात आली. तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांनी ८२४ कोटींचा निधी दिला. पहिल्या वर्षासाठी १० हजार टॅबची खरेदी झाली. धुळे, नंदुरबार, लातूर आणि बीड या चार जिल्ह्यांना वितरणही झाले होते.

परंतु आॅगस्ट महिन्यात राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सुरू असलेले टॅबचे वितरणही बंद झाले. दिवाळीनंतर त्याचे वितरण करण्याचे आश्वासन समाजकल्याणमंत्री अतुल सावे यांनी दिल्यानंतर वर्धा जिल्ह्यात १३०० टॅबचे वाटप झाले. पण मध्येच माशी शिंकली, ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करून सरसकट संपूर्ण राज्यभर सुरू झालेले टॅब वितरण थांबविण्यात आले. पुढे २० तारखेनंतर वितरण करण्याचा अवधी असताना विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे नाव पुढे करून वेळकाढूपणा केला. आता विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागल्याचे सांगत पुन्हा महिनाभर या टॅबचे वितरण लांबणीवर टाकले आहे.

स्मार्ट फोन घेण्याची एेपत नसलेल्या विद्यार्थ्यांनाच टॅब
अोबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील गरीब, खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांंसाठी महाज्योतीने नीट, जेईई आणि एमएचटीसीइटी परीक्षेचे आॅनलाइन प्रशिक्षण सुरू केले. पण अनेक विद्यार्थ्यांना परिस्थितीअभावी स्मार्ट फोन घेणे शक्य नसल्याने टॅब वितरणाचा निर्णय झाला आहे. त्याचा उपयोग स्पर्धा परीक्षांसाठीही ते करू शकतील, तसेच नंतर घरातील इतर भावंडांसाठीही त्याचा उपयोग होईल.

विद्यार्थीहितासाठी टॅब वितरीत करावे
ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर टॅब वितरणाचा आग्रह धरला होता. पण, विधिमंडळ अधिवेशन असल्याचे कारण देऊन महाज्योतीच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागल्याचे सांगता आहेत.

२ फेब्रुवारीला आचारसंहिता संपेल. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतील, ते कसे अभ्यास करतील. आता कुठलाही गाजावाजा न करता विद्यार्थीहितासाठी कार्यालयात बोलावून त्यांना टॅब वितरीत करावे. - दिवाकर गमे, माजी संचालक, महाज्योती

१४ हजार टॅब पडून
सन २०२२-२३ साठीचे ८९०० आणि २०२३-२४ या वर्षासाठी ४९०० टॅबची खरेदी झाली आहे. त्यात नाशिकसाठी ३६९ टॅबचे वितरण बाकी असून हे सर्व टॅब पडून आहेत.

बातम्या आणखी आहेत...