आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्वच मुलांना जीवनात शिस्तीचे धडे देणारे सैनिकी शिक्षण मिळावे, यासाठी केंद्र सरकारने देशात 100 सैनिक शाळा सुरू करण्याचे ठरवले. त्यानुसार आतापर्यंत 33 शाळा सुरू झाल्या आहेत.
येत्या दोन वर्षात ही संख्या शंभरी गाठेल आणि त्यानंतर पुढील दहा वर्षात एक हजारांपर्यत ही शाळांची संख्या पोहचेल, असा विश्वास संरक्षण मंत्रालयाचे निवृत्त कार्यकारी सचिव डॉ. अजयकुमार यांनी व्यक्त केली. दीडशे वर्षापूर्वी धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे यांनी सैनिकी शिक्षण प्रचार, प्रसाराचे पाहिलेले स्वप्न यानिमित्ताने खऱ्या अर्थाने साकार होत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
सेंट्रल हिंदु मिलीटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे जयंतीनिमित्त (सार्धशती) सोमवारी (दि.12) रोजी भोसलाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष लेप्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. डी. बी. शेकटकर हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपाध्यक्ष अॅड. अविनाश भिडे, कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगांवकर, नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्टन श्रीपाद नरवणे, कार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे, सहकार्यवाह नितीन गर्गे, शितल देशपांडे, मिलींद वैद्य, आशुतोष रहाळकर, नरेंद्र वाणी, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
तत्पूर्वी स्कूलच्या आवारातील शहीद स्मारक येथे प्रमुख पाहुण्यांनी पुष्पचक्र अर्पण केले. तसेच डॉ. मुंजे यांच्या समाधीस माल्यार्पण केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सुत्रबध्द संचलन करून मानवंदना दिली. अश्वपथकाने सादर केलेल्या तसेच स्कूल बॅँडच्या प्रात्याक्षिकांना उपस्थितांकडून दाद मिळाली. कमांडट ब्रिगेडीयर मंगलमुर्ती मसूर यांनी परिचय करून दिला. दीपाली धनाईत व धनश्री कापडणीस यांनी सुत्रसंचालन केले. मेजर सपना शर्मा यांनी आभार मानले.
डॉ. अजयकुमार म्हणाले, डॉ. मुंजे यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी चंदनाप्रमाणे झिजले. विविध आव्हानांना तोंड देत त्यांनी देशभक्ती व राष्ट्रनिष्ठेचे धडे समाजाला दिले. आपल्या अपूर्व ज्ञान ,कौशल्याने अलौकिक तेजाची प्रभा पसरवीत सतत सैनिकी शिक्षणाचा ध्यास घेतला. 1937 साली सैनिकी शिक्षणाला प्राधान्य देत भोसला विद्यालयाची स्थापना केली. काळाची गरज लक्षात घेऊन डॉ. मुंजेचे हेच स्वप्न आज केंद्र सरकार पूर्ण करत आहे. डॉ. शेकटकर म्हणाले, डॉ. मुंजे यांनी सैनिकी प्रशिक्षणाचे जे स्वप्न बघितले होते ते आज सत्यात उतरतांना दिसत आहे.
संस्थेतर्फे काढण्यात आलेल्या व शिल्पा खेर लिखित योध्दा, लढवय्या आणि कर्तव्यपथ या पुस्तकांचे तसेच सार्धशतीनिमित्त डॉ. मुंजेच्या विविध पैलूंवर दरमहा पुस्तिकेद्वारे प्रकाश टाकण्यात आला होता. त्यावर आधारीत विवेक विशेषांकाचे प्रकाशन झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.