आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअखिल भारतीय समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महाबौद्ध धम्म मेळावा आणि महाश्रामणेर शिबिराचे आयोजन नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर करण्यात आले आहे. शिबिरात बुधवारी (दि. २८) दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत १००० धम्म उपासक व श्रामणेर यांची नाशिक शहरातून रॅली तथा मिरवणूक काढण्यात आली. याचा समारोप म्हसरूळ येथे करण्यात आला.
महाश्रामणेर शिबिरानिमित्त गाेल्फ क्लब मैदानापासून सुरू झालेली ही रॅली सीबीएस, एमजीरोड, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, पेठरोडमार्गे म्हसरुळ येथे आली. म्हसरुळ येथील बौद्ध राजविहारात रॅलीचा समारोप झाला. मिरवणूक मार्गावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या मिरवणुकीमध्ये भन्ते नागसेन, भन्ते धम्मरत्न, भन्ते बोधीपाल, भन्ते महामोगलान, भन्ते सारीपुत्र, भन्ते कौटिण्य आदी सहभागी झाले होते.
याप्रसंगी भन्ते धम्मरत्न म्हणाले की, विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या शिकवणीची आज समाजाला गरज आहे. शांती निर्माण केली तर सर्व प्रश्न सुटतात. नव्या पिढीला सुसंस्कारी करण्यासाठी या महाश्रामणेर शिबिराचा उपयोग होत आहे, बहुजन समाजाला दिशा देण्याचे तसेच तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्याचे कार्य अशा शिबिरांच्या माध्यमातून होत असते, असेही ते म्हणाले.
मिरवणुकीतील लक्षवेधी देखावे सर्वांचेच आकर्षण ठरले होते. आयोजक मोहन अढांगळे, रमेश बनसोड, प्रदीप पोळ, राहुल बच्छाव, के. के. बच्छाव, गुणवंत वाघ, धीरज जाधव, रत्नमाला लोंढे, बाळासाहेब शिरसाठ, अशोक गवई, नितीन मोरे, अरुण काशिद, शिवाजी गायकवाड, वाय. डी. लोखंडे, डी. एम. वाकळे, अशोक गांगुर्डे, संदेश पगारे, सोमनाथ शार्दूल, संजय नेटावदे आदी सहभागी झाले आहेत.
रॅलीत सजीव देखावे
रॅलीत सर्वात पुढे भगवान गौतम बुद्धाचा पुतळा एका रथावर ठेवण्यात आला होता, तर त्यामागोमाग रथावर भगवान बुद्धाचा व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा व महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा सजीव देखावा होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.