आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निष्कर्ष:10 हजार विद्यार्थ्यांना लाभणार राेटरीच्या उज्ज्वल दृष्टी द्वारे चष्मे; 172 जणांना चष्म्याची गरज स्पष्ट

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राेटरी क्लब आॅफ नाशिकतर्फे उज्ज्वल दृष्टी अभियानाच्या माध्यमातून नाशिक शहर व परिसरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील मुलांच्या अद्ययावत मशिनद्वारे नेत्र तपासणीनंतर सुमारे १० हजार विद्यार्थ्यांना अचूक चष्मा बनवून देण्यात येणार आहे. आत्तापर्यंत राेटरीकडून करण्यात आलेल्या नेत्र तपासणीच्या निष्कर्षावरून ७०० मुलांची नेत्र तपासणी केल्यानंतर १७२ विद्यार्थ्यांना नंबरचे चष्मे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष सीए प्रफुल बरडिया यांनी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारताना आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे देण्याचा मानस व्यक्त केला होता. या उपक्रमाचा शुभारंभ प्रांतपाल डॉ. आनंद झुंझुनवाला यांच्या हस्ते लोकनेते व्यंकटराव हिरे शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत डोळे तपासणीनंतर प्रतिनिधीक २० विद्यार्थ्याना चष्मे वाटपाने सुरू झाले. एका पाहणीनुसार कोरोना काळात सोशल मीडियाच्या अतिवापराने अनेक विद्यार्थ्यांचे डोळे खराब झाले असून, त्यांचा नंबर वाढला आहे. त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर व येणाऱ्या काळात समस्यांचा विचार करत रोटरीने हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठीचा आर्थिक भार सांभाळण्यासाठी इंडियन व्हॉल्व कंपनीने सामाजिक दायित्व निधी अंतर्गत तयारी दर्शविली आहे.

संपूर्ण वर्षभर चालणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास नाशिक महानगरपालिका शाळा, रोटरी क्लब नाशिकच्या इंटरॅक्ट शाळा, मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या शाळा, जिल्हा परिषदेच्या नाशिक शहरातील शाळा तसेच डॉ. शरद पाटील यांचे कल्पतरू फाउंडेशन इत्यादी संस्थांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी अध्यक्ष सीए प्रफुल बरडिया, सचिव ओमप्रकाश रावत, प्रकल्प संयोजक उर्मी दिनानी, प्रणव गाडगीळ, सीएसआर संचालक कमलाकर टाक आदी कार्यरत आहेत.

बातम्या आणखी आहेत...