आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापावसाळा सुरू झाल्यानंतरही शहरातील १०७७ धोकादायक वाड्यांसह मिळकतीतील रहिवासी काही जागा खाली करण्यास तयार नसल्याचे बघून आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येथील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करा व कोणी एेकण्यास तयार नसेल तर संबंधित जागेचे क्षेत्रफळ मोजून त्यानंतर येथील वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे धोकादायक वाड्यांसह इमारतीत जीव मुठीत धरून राहणाऱ्यांबाबत पालिका अॅक्शन मोडवर येणार आहेत.
दरवर्षी पावसाळा आला की शहरातील धोकादायक बनलेल्या जुन्या इमारती, वाडे, घरांना पालिकेच्या माध्यमातून नोटिसा बजावण्याचे सोपस्कार पार पाडले जातात. २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सप्टेंबर महिन्यात धोकेदायक घरांना नोटिसा बजावल्या गेल्या होत्या. शहरातील भद्रकाली भागातील जुना वाडा कोसळून राजेंद्र बोरसे नामक व्यक्तीचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाल्यानंतर पालिकेने धोकेदायक घरांना नोटिसा बजावण्याची कारवाई केली होती. २०२१ मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नसताना व सर्व काही सुरळीत असताना पावसाळा सुरू होण्याची वेळ आली तरी, पालिकेचा अग्निशामक विभाग झोपेत होता.
नगररचना विभागाकडून आकडेवारी मिळेल व त्यानंतर कारवाई करण्याची भूमिका असल्यामुळे या प्रशासकीय बेफिकिरीबाबत टीका होत होती. आताचे आयुक्त पवार यांनी मे महिन्यातच धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. सर्वेक्षण करून जे वाडे धोकादायक असतील, त्यांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याच्याही सूचना दिल्या होत्या. त्यानंतर, संबंधित वाडे, इमारत व अन्य मिळकतधारकांना प्रथम नोटीस देऊन सुरक्षितस्थळी हलवण्याबाबत सूचित केले होते. त्यानंतरही अनेक मिळकतीत रहिवासी रहात असल्याचे आढळल्यामुळे आयुक्त पवार यांनी दुसऱ्यांदा नोटीस देऊन संबंधितांना सुरक्षितस्थळी जाण्यासाठी आदेशित करणे, संबंधित जागेचे क्षेत्रफळ मोजणे व वीज तसेच पाणीपुरवठा खंडित करण्याच्या सूचना दिल्या.
राजकीय नेत्यांच्या भीतीने जीव डावाला
जुने नाशिक आणि पंचवटी परिसरातील शेकडो वाड्यांमध्ये जुने भाडेकरू आहेत. या भाडेकरूंना दहा ते शंभर रुपये दरमहा नाममात्र भाडे आहे. या रकमेतून वाड्याच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही भागत नसल्याने घरमालक वैतागले आहेत. या असहायतेचा फायदा घेऊन अनेक राजकीय नेते, स्थानिक नगरसेवकांनी हे वाडे विकत घेतले आहेत. त्यातून वाड्यांना राजकीय हितसंबंध तयार झाल्याने पालिकाही गप्प आहे. त्यामुळे वाड्यातील जागा सडून अन्यत्र गेल्यास तेथील ताबा राजकीय वरदहस्त लाभलेल्या भूमाफियांकडून घेण्याच्या भीतीने रहिवासी जीव डावाला लावत असल्याचे चित्र आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.