आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक विस्कळीत:नाशिकजवळ एक्स्प्रेसचे 11 डबे घसरले; एकाचा मृत्यू, दुपारी 3.15 ला अपघात, मुंबईकडील वाहतूक संथ, भुसावळकडील लाइन ठप्प, अनेक स्थानकांवर खोळंबल्या गाड्या

मनमाड/नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक nashजवळील देवळाली ते लहवीत स्थानकादरम्यान ११०६१ डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनल कुर्ला ते मुझफ्फरपूर जयनगर पवन एक्स्प्रेसचे ११ डबे रविवारी दुपारी सव्वातीनच्या दरम्यान रुळावरून घसरले. यावेळी दरवाजात बसलेल्या एका प्रवाशाचा पडून मृत्यू, तर अन्य चौघे जखमी झाले. जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक संथ सुरू होती, तर भुसावळकडील लाइन पूर्ण ठप्प होती. वेगात धावणाऱ्या गाडीत अचानक झटका बसल्याने दरवाजात बसलेला प्रवासी खाली पडून त्याचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातामुळे दौंड मार्गावरच्या अनेक गाड्या ठिकठिकाणी रेल्वे स्थानकावर खोळंबून होत्या तर लांब पल्ल्याच्या काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. अपघाताचे वृत्त मनमाड येथे येताच मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकातून अपघातग्रस्त यातायात ट्रेन घटनास्थळी मार्गस्थ झाली. त्याचबरोबर मनमाड रेल्वे रुग्णालयाचे वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. अनेक गाड्या विलंबाने धावत असल्याने उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख जंक्शन असलेल्या मनमाड स्थानकात प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. नाशिकरोड स्थानकावरही प्रवाशांची गर्दी वाढली होती. प्रवाशांसाठी सामाजिक संस्थांनी नाश्त्याची व्यवस्था केली होती.

अपघातामुळे मुंबईहून मनमाडकडे येणाऱ्या डाऊन मार्गावरील अनेक गाड्या देवळाली कॅम्प, मनमाड, इगतपुरी, कसारा या स्थानकांसह विविध ठिकाणी थांबल्याने रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले. मुंबई- आदिलाबाद नंदिग्राम एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. २२२२१ डाऊन मुंबई- हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट एक्स्प्रेस वसई रोड, नंदुरबार, जळगावमार्गे भुसावळकडे वळविण्यात आली आणि १२२६१ डाऊन मुंबई-हावडा दुरांतो एक्स्प्रेस देखील नंदुरबार, जळगावमार्गे वळवण्यात आली. १२१७३ डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस प्रतापगड उद्योगनगरी सुपरफास्ट एक्स्प्रेस पुणे दौंड मनमाड मार्गे वळणार आहे तर या मार्गावरून धावणाऱ्या आणि मनमाडकडे येणाऱ्या अनेक गाड्या विलंबाने धावत आहेत.

अपघाताची चाैकशी हाेणार
रेल्वे रुळांची दर ८ तासांनी देखभाल केली जाते. या मेंटेनन्सच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अपघात झाला असल्याची शक्यता भुसावळ रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. याप्रकरणी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून चाैकशी करण्यात येणार आहे.

रविवारी रद्द गाड्या अशा
१२१४५ लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी एक्स्प्रेस
१२१११ मुंबई-अमरावती एक्स्प्रेस
१२११२ अमरावती-मुंबई एक्स्प्रेस
१२१०५ मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस
१७०५७ मुंबई-सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस
१७६१२ मुंबई - नांदेड एक्स्प्रेस

आजच्या रद्द गाड्या :
१७६११ नांदेड - मुंबई एक्स्प्रेस
१७६१७ नांदेड - मुंबई एक्स्प्रेस

उद्याच्या रद्द गाड्या :
१२१४६ पुरी – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस

म्हणून टळला मोठा अपघात
एलएचबी या जर्मन तंत्रज्ञानामुळे रेल्वे जरी रुळावरून घसरली तरी डबे एकमेकांवर न आदळता विलग होतात. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होते. तसेच अधिक नुकसान टळते.

नाशिकरोडहून विशेष रेल्वे
अपघातग्रस्तांसाठी नाशिकरोडहून पुढील प्रवासासाठी विशेष रेल्वे. प्रवाशांकडे जे तिकीट असेल त्यावर त्यांना देण्यात आला प्रवेश.

पंचवटी आजही रद्द
अपघातामुळे रविवारी सायंकाळी मुंबई- मनमाड पंचवटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. सोमवारीही (दि.४) सकाळी सहा वाजता मनमाड येथून सुटणारी पंचवटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...