आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील गुन्हेगारी नियंत्रण व पाेलिस दलाचा वचक निर्माण करण्यासाठी कुठल्याही घटनेच्या वेळी घटनास्थळी कमीत कमी वेळेत पाेलिस पाेहाेचण्यासाठी तत्कालीन पाेलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या कार्यकाळात आयुक्तालय हद्दीत सार्वजनिक व संवदेनशील ठिकाणांवर ‘क्यूआर काेड’ लावण्यात आले. याठिकाणी २४ तासातून किमान चार ते सहा वेळा बीट मार्शल, वरिष्ठ निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांना ठरवून दिलेल्या वेळेत गस्त पूर्ण करून त्यांनी त्यांच्या माे बाइलवर काेड स्कॅन करण्याचे आदेश देण्यात आले.
सर्वच पाेलिस ठाण्यांच्या अंतर्गत नियुक्त बीट मार्शलकडून त्याची काटेकाेर अंमलबजावणी हाेत असल्याने त्या ठिकाणी टवाळखाेर, मद्यपी, अश्लील चाळे करणाऱ्यांवर प्रेमीयुगुल व सराईत गुन्हेगारांना जरब बसली हाेती. मात्र, गेल्या दीड वर्षापासून हे ‘क्यूआर काेड’ दिखावाच ठरत आहेत. विशेष म्हणजे, आयुक्तालयाच्या हद्दीत चाेवीस तास गस्त घालणाऱ्या बीट मार्शलची संख्या देखील अपुरी असून त्यांना गस्तीसाठी दुचाकीच उपलब्ध नसल्याची बाब यानिमित्त समाेर आली आहे. या बीट मार्शलला पाेलिस ठाण्याचे टपाल आयुक्तालयात अथवा इतर अधिकाऱ्यांच्या दालनाता देण्यासाठीच फिरावे लागत असल्याचेही चित्र आहे. तत्कालीन पाेलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल व त्यांनतर सन २०१९ मध्ये तत्कालीन आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या कार्यकाळात वाढती गुन्हेगारी नियंत्रणासाठी विविध उपाययाेजना करण्यात आल्या हाेत्या.
अधिकाऱ्यांनी स्वत: यावे
दिवसा दुपारी १ ते सायं. ५ वाजेच्या व रात्री ९ ते १२ वाजेच्या सुमारास सुरुवातीला नियमित पाेलिसांची गस्त व्हायची. क्यू आर स्कॅनिंगमुळे कर्मचारी येत असल्याने ट्रॅकवर अश्लील चाळे करणारे व टवाळखाेरांवर जरब हाेती. आता स्थिती गंभीर असून स्वत: वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गस्त घालण्याची वेळ आली आहे. - कृष्णा नागरे, जाॅगर्स क्लब
गुन्हेगारीत लक्षणीय वाढ
नाशिक शहरात खून, दराेडे, प्राणघातक हल्ले, साेनसाखळी चाेरीसारख्या गंभीर गुन्ह्याच्या संख्येत लक्षणीय वाढ हाेत असून सन २०२१ मध्ये २८४४ गुन्ह्यांची नाेंद झाली . २०२२ मध्येच या संख्येतमध्ये ७०० हून अधिक गुन्ह्यांची वाढ हाेऊन ३४५० गुन्हे नाेंदले गेले हाेते. यामध्ये गत वर्षांत खुनाचे ३० गुन्हे तर प्राणघातक हल्ले २९, साेनसाखळी लुटीच्या गुन्ह्यांची संख्या ८० वर पाेहाेचली हाेती.
याेग्य उपाययाेजना करणार
आयुक्तालय हद्दीत क्यूआर काेड आधारित गस्त काही तांत्रिक अडचणींमुळे बंद असली तरी नव्याने त्यात सुधारणा करून बीट मार्शलची स्वतंत्र गस्त वाढविण्यात येणार आहे. अपुरे मनुष्यबळ व कमी वाहन या समस्याही दूर केल्या जातील. लवकरच शहरात क्यूआर कोडची संख्या, नियमितपणे गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येईल. - अंकुश शिंदे पोलिस आयुक्त
वाहनांचा जाणवताेय तुटवडा, स्वमालकीच्या गाड्यांवर गस्त
क्यूआर काेडस्कॅनिंगसह गस्तीची मुख्य जबाबदारी असणाऱ्या बीट मार्शलची संख्या आणि त्यांची हद्द बघता एकेका कर्मचाऱ्याला चार ते पाच किलाेमीटर क्षेत्रावर देखरेख ठेवणे अशक्य आहे. त्यातच १३ पाेलिस ठाण्यांतील ६५ पाेलिस चाैक्यांसाठी प्रत्येकी एकेक बीट मार्शल नियुक्त असले तरी प्रत्यक्षात त्यांची संख्या केवळ ५० ते ५२ इतकीच आहे. आणि एकेका मार्शलला २५-२५ ठिकाणी १२ तासांत चार-चार वेळा भेट देऊन गुन्हेगारी राेखणे शक्यच नसल्याने ही कारवाई कागदावरच राहत आहे. पंचवटी, अंबड सारख्या माेठ्या पाेलिस ठाण्यांमध्ये सुद्धा ५ बीट मार्शलला केवळ एक- दाेनच दुचाकी आहेत. निम्म्याहून अधिक बीट मार्शल ना स्वमालकीच्या वाहनांवर गस्त घालावी लागते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.