आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पबजी खेळता खेळता 12 वर्षांचा नागेश रेल्वेने नांदेडहून पोहोचला नाशिकरोडला; पोलिसांमुळे 24 तासांनंतर पुन्हा वडिलांच्या ताब्यात

नाशिकरोड16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाइलवर पबजी खेळता खेळता १२ वर्षाचा मुलगा नांदेडहून थेट रेल्वेत बसला. गेममध्ये स्पर्धा वाढत गेल्याने तो गुंतत गेला व आपण काय करतोय हे उमजण्यापलीकडे तो गेला. गाडी पुढे झेपावत होती आणि तोही वेगाने घरापासून दुरावत चालला होता. मुलगा घरी नसल्याने शोधाशोध सुुरू झाली. रेल्वे पोलिसांपर्यंत घरचे पोहोचले. व्हॉट्सअॅपवर मुलाचा फोटो पोलिसांपर्यंत पोहोचला. संध्याकाळ होत आली. घरच्यांची घालमेल वाढत होती. अखेर सायंकाळी नाशिकरोड पोलिसांना हा मुलगा तपोवन एक्स्प्रेसमध्ये आढळला. प्रचंड भेदरल्याने तो बोलतच नव्हता. काही तासांनी त्याने माहिती दिली. मुलगा मिळाल्याचा फोन वडिलांना गेला. प्रचंड धावपळ करत त्यांनी नाशिकरोड स्थानक गाठले आणि पोटचा गोळा तब्बल २४ तासांनी मिळाल्यानंतर त्यांनी त्याला मिठीच मारली.

नांदेड जिल्ह्यातील बिलोरी तालुक्यातील हरनाळा येथील नागेश माधवराव जाहुरे (१२) हा बुधवारी सकाळी अंगणात पबजी खेळत होता. मुलगा मोबाइलवर आहे हे बघून घरच्यांनीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. खेळता खेळता तो नांदेड रेल्वेस्थानकावर पोहोचला व सकाळी साडेदहाच्या नांदेड-मुंबई तपोवन १०एक्स्प्रेसमध्ये बसला आणि पुढे मग घरच्यांची घालमेल सुरु झाली. सर्वत्र शोधल्यानंतरही नागेश सापडत नसल्याने घरच्यांनी अखेर रेल्वे स्थानक गाठले. रेल्वे पोलिसांना माहिती दिली. सीसीटीव्हीमध्ये १२ वर्षांचा चौकटी शर्ट घातलेला मुलगा हातात फोन घेऊन दिसला. तोच नागेश असल्याचे वडिलांनी सांगितले. पोलिसांनी तत्काळ सर्व स्थानकांवरील पोलिसांना मुलाचा फोटो आणि माहिती पाठवून दिली. अखेर बुधवारी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या दरम्यान नागेश नाशिकरोड रेल्वे पोलिसांना सापडला. नाशिकरोड रेल्वे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश कुलकर्णी यांनी सांगितले की, तपोवन एक्स्प्रेसमधून एक मुलगा गर्दीचा फायदा घेऊन लपत जाताना पोलिस विजय कपिले यांना दिसला. त्याला थांबवून विचारपूस केली असता तो खोटे बोलत असल्याचे लक्षात आले. हवालदार विलास इंगळे, चेतना शिरसाठ, सरला बिरोटे, अश्विनी प्रधान, राकेश शेडमाके यांनी त्याला बोलते केले व त्याने वडिलांचा मोबाइल क्रमांक दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ संपर्क साधला व हरवलेला नागेश सापडल्याने २४ तासांपासून सुरु असलेला पेच सुटला.

मोबाइलमुळे मुलाकडे दुर्लक्ष
आजोबांचा लाडका असल्याने त्याला मोबाइलपासून कुणी रोखत नव्हते. त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष केले. नशीब चांगले म्हणून आम्हाला मुलगा सापडला. हरवला असता तर मोबाइल आणि पबजी काय भावात पडले असते? - माधवराव जाहुरे, मुलाचे वडील

पालकांनी लक्ष द्यावे
लाॅकडाऊनमुळे सर्व मुलांच्या हाती मोबाइल दिसू लागले. परंतु, आता वातावरण बदलले आहे. त्यामुळे आपली मुले मोबाइलमध्ये काय करतात याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे.पबजीसारख्या हानिकारक खेळांपासून मुलांना रोखले पाहिजे. - महेश कुलकर्णी, प्रभारी अधिकारी, नाशिकरोड रेल्वे पोलिस ठाणे

बातम्या आणखी आहेत...