आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अत्याचार:नाशिकमध्ये तेरा वर्षीय मुलीवर सहा नराधमांचा सामूहिक अत्याचार; महिलेसह 7 अटकेत, पोस्कोअंतर्गत गुन्हा

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संशयितांविरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून सहा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या सामानगाव रोड, अरिंगळे मळा येथे उघडकीस आला. विशेष म्हणजे या संशयितांना एका महिलेने मदत करत तिचे घर उपलब्ध करून दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी महिलेसह सहा जणांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. संशयितांविरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक समाधान खरात (रा. सिन्नर फाटा), रवी संतोष कुऱ्हाडे (रा. पांडवलेणी), आकाश राजेंद्र गायकवाड (रा. रेल्वे ट्रॅक्शन), सुनील निंबाजी कोळे (रा. आम्रपाली झोपडपट्टी), सोमनाथ विजय खरात (रा. गुलाबवाडी) आणि संशयित महिला पूजा सुनील वाघ यांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. शनिवारी (दि.९) रात्री पीडितेची आई मजुरी करून अरिंगळे मळा येथील घरी आली असता मुलगी घरात नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तिचा परिसरात शोध घेण्यात आला. त्या वेळी एका ठिकाणी ती रडत बसली असल्याचे आईच्या निदर्शनास आले. तिची परिस्थिती बघून आईला संशय आला. पीडितेने तिच्यावरील प्रसंग सांगितला. हे सर्व एेकल्यानंतर आईला भोवळ आली. त्यांनी मुलीला घेऊन त्यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्ह्याची गंभीर दखल घेत तत्काळ गुन्हा दाखल केला. सहायक आयुक्त समीर शेख, वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली, गणेश न्यायलदे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयितांना अटक केली.

सात तास केला अत्याचार
पीडित मुलगी गरीब आहे. संशयित महिलेने पीडितेला भांडे घासण्याचा बहाणा करत तिला घरी नेले. मुलगी घरात गेल्यानंतर संशयित महिला बाहेर आली व बाहेरून कडी लावून घेतली. संशयितांनी मुलीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. पीडितेवर संशयित सात ते आठ तास अत्याचार करत होते. ती बेशुद्ध पडल्यानंतर तिला संशयित महिलेने घरात काही वेळ झोपून ठेवत तिला रात्री उशिरा घराजवळ सोडून दिले अशी माहिती पोलिसांनी दिली. पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...