आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायाभूत सुविधांमधून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी फायदा:मेरी हायस्कूलच्या शिक्षकांकडून "नाएसो' संस्थेस 14 लाखांचा कृतज्ञता निधी

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या विकासात आजी माजी पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे योगदान मोलाचे आहे. संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त मेरी शाळेतील शिक्षकांकडून संस्थेस साडेबारा लाखांचा तर माजी शिक्षकांकडून स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने संस्थेस दोन लाखांचा कृतज्ञता निधी देण्यात आला.

या निधीच्या माध्यमातून नवीन इमारत, काॅम्प्युटर, प्रयोगशाळांचे नुतनीकरण, सोलर पॅनल अशा विविध सुविधा उपलब्ध केल्या जात असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देण्यासाठी संस्थेच्या विविध शाळांत पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहे.

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सी.डी.ओ. मेरी शाळेच्या प्रांगणात आजी-माजी पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा स्नेह मेळावा पार पडला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर, उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके, कार्यवाह राजेंद्र निकम, शाळा समिती अध्यक्ष पांडुरंग अकोलकर, कार्यकारी मंडळाचे सदस्य चंद्रशेखर वाड, विश्वास बोडके, सरोजिनी तारापूरकर, सचिन महाजन, प्रियंका निकम, नरेंद्र मोहिते, शैलेश पाटोळे, विजय मापारी उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप अहिरे यांनी केले. उपस्थितांचे आभार राजेंद्र निकम यांनी मानले. मुख्याध्यापक सुनील सबनीस यांनी स्वागत केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

माजी शिक्षकांकडून संस्थेस निधी

शाळा समिती अध्यक्ष पांडुरंग अकोलकर यांनी संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त एक लाख ११ हजार १११ रुपयाची देणगी दिली. शाळेच्या माजी शिक्षिका रत्नावली ढगे यांनी ५१ हजार, व्हि. टी. जाधव यांनी पाच हजार रुपये, सतीश मुळे यांनी अडीच हजार रुपये, प्र. ल. सोनी यांनी पाच हजार रुपये, सीताराम सूर्यवंशी यांनी ११ हजार रुपये तर जय भालेराव यांनीही ११ हजार देणगी दिली आहे.

माजी शिक्षकांचा संस्थेला विशेष अभिमान

नाशिक एज्युकेशन सोसायटीने यशस्वी वाटचालीची ९९ वर्षे पूर्ण करून शतक महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. तसेच सीडीओ मेरी हायस्कूलने देखील मेरी परिसरातील लाखो विद्यार्थ्यांना ४१ वर्ष सतत मार्गदर्शन केले असून शाळेने ४२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या विविध क्षेत्रात उत्तम यश संपादन केले आहे. संस्थेच्या माजी शिक्षकांचा संस्थेला व शाळेला विशेष अभिमान आहे. - प्रा. सूर्यकांत रहाळकर, अध्यक्ष, नाएसो.

बातम्या आणखी आहेत...