आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराला ‘ताप:डेंग्यूचे 157 नवीन रुग्ण, चिकुनगुन्याचे 28 ; पेस्ट कंट्राेल कागदाेपत्रीच; मलेरिया विभाग वादात

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालिकेच्या मलेरिया विभागाच्या दुर्लक्षामुळे पेस्ट कंट्राेल केवळ कागदाेपत्रीच हाेत असल्यामुळे ऐन दिवाळीच्या कालावधीत अर्थात ऑक्टाेबर महिन्यात डेंग्यूचे १५७ नवीन रुग्ण आढळले असून हे सर्व रुग्ण रेकाॅर्डवरील आहेत. प्रत्यक्षात डेंग्यूची लक्षणे असलेले व खासगी रुग्णालयांनी न कळवलेल्या रुग्णांची संख्या माेठी असल्याचे बाेलले जाते. दरम्यान, पेस्ट कंट्राेलच्या ३१ काेटींच्या ठेक्यात वादग्रस्त ठेेकेदारांना पात्र करण्यासाठी धडपड सुरूच असून तांत्रीक कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया जवळपास पंधरापेक्षा अधिक दिवस हाेऊनही प्रलंबित आहे.

स्मार्ट, स्वच्छ व सुंदर अशी आेळख असलेल्या नाशिक शहरात आराेग्याची दैना उडाली आहे. यंदा पावसाळा लांबल्यामुळे साथजन्य आजारांनी चांगलाच धुमाकूळ घातला. लांबलेला पाऊस लक्षात घेत प्रामाणिकपणे शहरात पेस्ट कंट्राेल करणे गरजेचे हाेते, मात्र एका अधिकाऱ्याची ठेकेदाराशी असलेली कथित भागीदारीचा फटका संपूर्ण शहराला बसल्याचे चित्र आहे. शहरात अनेक ठिकाणी आैषध व धुरफवारणी नियाेजित वेळेत हाेत नसल्यामुळे डेंग्यू, चिकुनगुन्या, मलेरियासारख्या आजारांनी डाेकेवर काढले. ऑगस्टपासून या आजाराशी संबंधित रुग्ण सातत्याने वाढतच गेले. ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ९९ रुग्ण असताना सप्टेंबरमध्ये त्यात वाढ होऊन १३९ पर्यंत बाधितांचा आकडा गेला.

चिकनगुन्यामुळेही रुग्ण त्रस्त; तापाचेही रुग्ण वाढले डेंग्यूबराेबरच चिकुनगुन्याचे २८ रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे, तापसदृश आजाराने शहरात थैमान घातले असून गेल्या महिनाभरात तापसदृश आजाराचे २७३५ रुग्णांनी पालिका रुग्णालयात उपचार घेतले आहेत. खासगी रुग्णालयातील तापसदृश आजाराच्या रुग्णांची संख्या मोठी असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, शहरात आतापर्यंत स्वाइन फ्लूचे १४८ रुग्ण आढळले असून त्यातील दहा रुग्णांचा बळी गेला आहे. हिवाळ्यामुळे स्वाइन फ्लू संशयित रुग्ण वाढण्याची शक्यता असून नाशिककरांनी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डाॅ. बापूसाहेब नागरगाेजे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...