आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनाथ, वंचितांना मदत व्हावी या उद्देशाने सुसंस्कृती फाउंडेशनच्या वतीने ‘एक मुठ्ठी अनाज’ उपक्रम राबविण्यात येताे. याच अंतर्गत फाउंडेशनच्या वतीने इंदिरानगरमधील स्वर्णिमा हाॅलमध्ये “गाणी मनामनातली” हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तब्बल १७० किलाे धान्य व ३१ हजार रुपये संकलित करण्यात आले.
सुसंस्कृती फाउंडेशनने या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन संगीता सदर (घरकामगार), रंजना भदाणे (फूलविक्रेती), हर्षल ठोसर (पेपरविक्रेता), भरत साळवे (भाजीवाला), सुरेश सांगळे (ड्राइव्हर) या समाजातील कष्टकरी लाेकांच्या हस्ते करण्यात आले आणि फाउंडेशनतर्फे त्यांचा सत्कार करून एक नवीन पायंडा पाडल्याची माहिती सुसंस्कृती फाउंडेशनचे संस्थापक धनंजय जैन यांनी दिली. सुसंस्कृती फाउंडेशनचे अध्यक्ष आणि ‘एक मुठ्ठी अनाज’ योजनेचे प्रमुख अशोक आचार्य याप्रसंगी म्हणाले की, आमच्या ‘एक मुठ्ठी अनाज’ योजनेला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून समाजातील तळागाळातील लोकांकडून मिळालेले योगदान आमच्यासाठी फार मोलाचे आहे. याच कार्यक्रमात भास्कर आचार्य यांनी ११ हजार रुपयांच्या देणगीचा धनादेश फाउंडेशनकडे सुपूर्द केला.
रंगला ‘गाणी मनामनातील’ मराठी गाण्याचा कार्यक्रम
यानिमित्ताने “गाणी मनामनातली” हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर झाला. धनंजय जैन, प्रशांत पाणदारे, सचिन नाईक, श्याम जाधव, नंदू काळे, वैशाली खेरुड, सारिका कोल्हटकर, वैशाली पंडित, मनुजा रत्नपारखी यांनी गाणी सादर केली. सूत्रसंचालन मनुजा रत्नपारखी यांनी केले. शोधिसी मानवा, शुक्रतारा मंदवारा, मन उधाण वाऱ्याचे, भातुकलीच्या खेळामधले, ऐरणीच्या देवा तुला, मनाच्या धुंदीत अशी एकाहून एक सरस गाणी सादर करून प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळवली तर काही गाण्यांना वन्स मोअरचा आग्रह धरला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.