आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद आत्महत्येच्या प्रकरणाला मालमत्ता वादाची किनार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर, या आखाड्यांची मुख्यालये असलेल्या एकट्या त्र्यंबक शहरात (नाशिक) तब्बल १८० एकर जमीन असल्याची माहिती “”दिव्य मराठी’च्या हाती लागली आहे. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या दोन तालुक्यांतील आखाड्यांची मालमत्ता काही हजार एकरांच्या घरात जात असून यावरून येथेही वेळोवेळी अनेक वाद व खटले दाखल झाले आहेत.
शैव आखाड्यांचे मुख्यालय असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये १० आखाड्यांची मोठ्या प्रमाणात जमीन आहे. स्वातंत्र्य पूर्व काळात तत्कालीन संस्थानिकांनी व राजेमहाराजांनी आखाड्यांच्या देखभालीसाठी या जमिनी बहाल केल्या होत्या. स्वातंत्र्योत्तर काळात देवस्थानच्या जमिनींना कूळ कायद्यातून वगळण्यात आल्याने या मालमत्ता त्यांच्यात ताब्यात राहिल्या. यावर कसणाऱ्या आदिवासींना या जमिनीच्या मालकी हक्कासाठी अनेक खटले दाखल केले असूनही त्यांच्या बाजुने न्याय होऊ शकला नाही. उलट या जमिनींच्या खरेदी विक्रीवरून अनेक वाद उद्भवल्याच्या इतिहासात नोंदी आहेत.
केवळ त्र्यंबकेश्वर शहराच्याच हद्दीत प्रमुख १० आखाड्यांच्या नावे तब्बल ७२.१६ हेक्टर म्हणजे १८०.४ एकर इतके क्षेत्र असल्याचे ‘दैनिक दिव्य मराठी’च्या हाती लागले आहे. त्यावर करण्यात आलेले बांधकाम आणि उभारलेल्या महलांची किंमत ती वेगळीच.
विविध आखाडे, साधू, महंतांची चौकशी करण्याची मागणी
त्र्यंबकेश्वर | आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी यांच्या मृत्यूमुळे मोठी हानी झाली आहे. आखाड्याची जागा व संपत्तीवर अनेकांचा डोळा असतो. त्यांचा मृत्यू संशयास्पद अवस्थेत झाल्याने काहीतरी काळेबेरे असावे असा संशय निर्माण होत आहे. त्यांना दबाव टाकून काही व्यक्ती ब्लॅकमेल करत असल्याचे सांगितले जाते. याबाबत त्र्यंबकेश्वर आखाडा साधू महंतांनी घटनेचा निषेध करून या घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
महंत नरेंद्रगिरी यांच्या मृत्यूमुळे त्र्यंबकेश्वर येथील दशनामी संन्यासी आखाड्यात खळबळ उडाली असून महंत नरेंद्रगिरी हे स्वभावाने सरळ होते. नरेंद्रगिरी यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी, असे आनंद आखाड्याचे महंत गणेशानंद म्हणाले. महंत नरेंद्रगिरी यांच्या मृत्यूमुळे सर्व साधू महंत व भक्तांना अतिव दुःख झाले आहे. त्यांच्या मृत्यूची वरिष्ठ स्तरावर चौकशी करत सत्य बाहेर आले पाहिजे, अशी भावना महंत गणेशानंद यांनी व्यक्त केली.
आखाडा मालमत्ता (एकरमध्ये)
{ महानिर्वाणी आखाडा - ४०.५५
{ पंचायती आखाडा - २.२७
{ निरंजनी आखाडा - ३.६७.७
{ पंचायती जुना उदासी आखाडा - ४१
{ समस्त पंचायती आखाडा नवा - ३७.५
{ आवाहन पंचायती आखाडा - ११.१२
{ नीलपर्वत पंच जुना आडा - ११.१२
{ पंच अग्नी आखाडा - १.३
{ शंभू अटल पंचायत आखाडा - २८.५
{ निर्मल पंचायती आखाडा - ११.३५
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.