आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • 20 Crore Onion Scam Updates: NAFED's 'family Welfare' In The Name Of Consumers; Purchases From Traders In The Name Of Farmers; News And Live Updates

संशयास्पद:20 कोटींचा कांदा घोटाळा, ग्राहकांच्या नावाखाली नाफेडचे ‘कुटुंब कल्याण’; शेतकऱ्यांच्या नावाने व्यापाऱ्यांकडून खरेदी

नाशिक2 वर्षांपूर्वीलेखक: दिप्ती राऊत
  • कॉपी लिंक
  • संचालकांच्याच 5 कंपन्या; तीन कंपन्यांमध्ये पत्नी संचालक, तर मुलाच्या नावे 6 कंपन्या
  • शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महाराज्य फेडरेशनवर प्रश्नचिन्ह

पावसाळ्यानंतर वाढणारे कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी नाफेडद्वारे सुरू असलेल्या “फार्म गेट’ खरेदीत काही “ऑफलाइन’ शेतकरी उत्पादक कंपन्या आणि नाफेडचे अधिकारी संगनमताने कोट्यवधींचा घोटाळा करत असल्याचे धक्कादायक प्रकार पुढे अाले अाहेत. सदर फेडरेशनने ‘नाफेड’च्या सिस्टिमनुसार काम सुरू असल्याचा दावा केला असून नाफेडच्या अधिकाऱ्यांनी मात्र तपशील देण्यास नकार दिल्याने या कांदा खरेदीभोवतीचे संशयाचे ढग अधिकच दाट झाले आहेत. शेतीमालाचे भाव वाढल्यास ग्राहकांना दिलासा मिळावा व पडल्यास शेतकऱ्यांना आधार मिळावा या उद्देशाने केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वतीने दर स्थिरीकरण योजना राबवली जाते.

याअंतर्गत चालू वर्षात कांदा आणि डाळी खरेदी करण्यासाठी २७०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी नाफेडद्वारे महाराष्ट्रातून १.५ लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असून एप्रिलपासून सुरू असलेली ही खरेदी जुलैपर्यंत चालणार आहे. मात्र, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या फेडरेशनच्या वतीने सुरू असलेल्या या खरेदीत पारदर्शकता न बाळगल्याने व्यापाऱ्यांचा कांदा शेतकऱ्यांचा कांदा दाखवणे, ठरलेल्या भावापेक्षा कमी किंमत देणे आणि चाळींच्या भाड्यातही अनियमितता करणे असे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी अाहेत.

महाराज्य फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश भीमराव पवार संचालक असलेल्या ५ कंपन्या

  • जीएसपी डेअरी अँड अॅग्रो प्रायव्हेट लि.
  • पांझरा परिसर शेतकरी उत्पादक कंपनी
  • कसमादे परिसर अॅग्रो प्रोड्युसर कंपनी
  • कसमादे मल्टिपर्पज निधी कंपन
  • महाराज्य शेतकरी उत्पादक कंपनी

गोदावरी सुरेश पवार संचालक असलेल्या कंपन्या

  • पांझरा परिसर फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड
  • कसमादे परिसर अॅग्रो प्रोड्युसर कंपनी
  • जीएसपी डेअरी अँड अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी

गणेश सुरेश पवार संचालक असलेल्या कंपन्या

  • कसमादे परिसर अॅग्रो प्रोड्युसर कंपनी
  • जीएसपी डेअरी व अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी
  • महाराज्य ग्रुप ऑफ फार्मर प्रोड्युसर कंपनी
  • मोसम खोरे फार्मर प्रोड्युसर कंपनी
  • कसमादे मल्टिपर्पज निधी लिमिटेड कंपनी
  • देवमामलेदार फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड

खरेदीचे गौडबंगाल, फेब्रुवारीत स्थापना, एप्रिलमध्ये काम
“नाफेड’द्वारे सध्या राज्यात महा-एफपीसी फेडरेशन, महाराज्य फेडरेशन आणि पृथाशक्ती फेडरेशन या तीन राज्यस्तरीय फेडरेशनद्वारे कांदा खरेदी सुरू आहे. यापैकी ३०३ शेतकरी उत्पादक कंपन्यांचे फेडरेशन असलेल्या महा-एफपीसी या फेडरेशनच्या कांदा खरेदीची माहिती “महाअनियन’ या पोर्टलवर उपलब्ध आहे. यंदा मात्र, “नाफेड’च्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कांद्याची रिकव्हरी काढून त्यांना फक्त २५ हजार मेट्रिक टन खरेदीचे काम दिले आहे. दुसरीकडे कौटुंबिक फेडरेशन असलेल्या आणि कोणतीही “ऑनलाइन’ माहिती उपलब्ध नसलेल्या महाराज्य फेडरेशनद्वारे तब्बल ७० हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी सुरू आहे. अवघ्या १४ कंपन्यांद्वारे सुरू असलेल्या या खरेदीत ठरलेले भाव न देणे, चाळीचे भाडे दडवणे, व्यापाऱ्यांचा कांदा शेतकऱ्यांचा कांदा म्हणून वळवणे असे धक्कादायक प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी “दिव्य मराठी’कडे केल्या आहेत.

टार्गेट पूर्ण करायचे आहे, अटी-शर्तींची माहिती देऊ शकत नाही.
आम्हाला सर्वांसोबतच काम करायचे आहे, अधिकाधिक टार्गेट पूर्ण करायचे आहे. जे जास्तीत जास्त खरेदी करून देतील त्यांच्यासोबत आम्ही काम करीत आहोत. कोणामार्फत किती व कशी खरेदी करताे त्याच्या अटी-शर्तींची माहिती अाम्ही देऊ शकत नाही. - शैलेंद्रकुमार, पिंपळगाव शाखा व्यवस्थापक, नाफेड

‘नाफेड’च्या सिस्टिमनुसारच आम्ही काम करत आहोत
आमच्या फेडरेशनच्या ५० कंपन्या आहेत. नाशिक, नगर आणि पुण्यातील शेतकऱ्यांकडून आम्ही कांदा खरेदी करत आहोत. नावे सारखी असली तरी कंपन्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या अाहेत.‘नाफेड’च्या सिस्टिमनुसारच अाम्ही काम करत आहोत. - सुरेश पवार, संचालक, महाराज्य फेडरेशन