आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाकवी कालिदास कलामंदिरात सत्रानुसार भाडे अनामत रक्कम अशा विविध मार्गाने एका प्रयोगासाठी जवळपास २० हजार रुपये भाडे घेतले जाते. सुविधा मात्र शुन्य आहेत. याचा प्रत्यय रविवारी आला. प्रचंड उकाडा वाढलेला असतानाही नाट्यगृहातील एसी दिवसभर बंद असल्याने प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा पारा चढला. अखेर अभिनेते वैभव मांगले यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. त्यानंतर काही प्रेक्षक थांबले तरी तब्बल ६० प्रेक्षकांनी आपल्या तिकिटांचे पैसे परत घेतले. एकिकडे हा गोंधळ सुरू असताना मात्र महाकवी कालिदास कलामंदिराचे व्यवस्थापक, सुपरवायझर किंवा इतर कोणतेही कर्मचारी हजर नव्हते किंवा ते फोनही घेत नसल्याचे येथील नाट्य ठेकेदार आणि काही प्रेक्षकांनी सांगितले. या नाटकाला आलेले ज्येष्ठ नागरिक प्रचंड उकाड्याने मात्र हैराण झाले हाेते. यावर आम्ही अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता केवळ ‘माहिती घेतो’ असे उत्तर मिळाले. महाकवी कालिदास कलामंदिराच्या नुतनीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करुनही हा खर्च केवळ वरवरच केल्याचे आता दिसून येते आहे. वातावरणात प्रचंड बदल झाल्याने उष्णतेचा पारा ४० पर्यंत पोहोचला असताना नाट्यगृहातील एसी रविवारी (दि. १४) सकाळपासूनच बंद पडला होता.
येथे प्रचंड उकडत असल्याने प्रेक्षक घामाघूम झाले होते. अनेक प्रेक्षकांनी निघून जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अखेरीस मध्यंतरात नाटकातील अभिनेते वैभव मांगले यांनी प्रेक्षकांना विनंती केली, आम्ही मुंबईहून नाटक घेऊन आलो आहोत. संपूर्ण संच आहे. एसीचे आधी माहिती असते तर प्रयोगच केला नसता. मात्र आता कलेवरच्या आणि कलाकारांच्या प्रेमापोटी आपण नाटकाला थांबले आहात, मात्र यानंतर आपण तिकिट काढताना एसी आहे का असे विचारा. असा संवाद त्यांनी साधल्यावर प्रेक्षक थांबले. तरीही तब्बल ६० प्रेक्षकांनी आपले तिकिटाचे पैसे परत नेल्याचे नाट्यसेवाचे राजेंद्र जाधव यांनी सांगितले.
नाटकाचे दरही किमान ५०० रुपये असतात. नाशिकमध्ये हे एकमेव नाट्यगृह आहे. तीथे जर महापालिका सुविधा देत नसेल तर नाटकवाल्यांकडून एवढे भाडे कशाचे घेतात? याठिकाणी कोणत्याच सोयी नाही. उन्हाळ्याचे दिवस आहेत. ज्येष्ठ नागरिकांचाही विचार करत नाहीत . - निहाल वाघ, नाट्यरसिक
याला जबाबदार कोण, ऐकून घ्यायला एक अधिकारी नाही...
कोणत्याही थिएटरमध्ये व्हेंटीलेशन नसते. एसीशिवाय प्रयाेगच लावता येत नाही. एसी जर बंद आहे तर सांगायला नको का? ती बेसीक गरज आहे. अखेरीस प्रेक्षक हवालदिल झाले आणि उठून जायला लागले. आम्ही तर स्टेजवर घामाघूम झालो होतो. अशा सगळ्यात प्रेक्षकही अस्वाद घेऊ शकत नाही. या ठिकाणी तक्रार ऐकून घ्यायला पालिकेचा एकही अधिकारी नव्हता हे आणखीच दुर्दैव. अखेरीस प्रेक्षक मायबाप असतात. त्यांना विनंती केल्यावर ते थांबले. यामुळे मात्र आम्ही आमच्या पुढील तारखा रद्द केल्या आहेत. - वैभव मांगले, अभिनेते
याबाबत तत्काळ माहिती घेण्यात येईल
महाकवी कालिदास कलामंदिरातील एसी बंद पडल्याची माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. याबाबत तत्काळ माहिती घेताे आणि एसी दुरुस्ती असेल किंवा अन्य काही कारणाने एसी बंद पडला असेल त्यावर त्वरीत काम करण्यात येईल. - मनाेज घाेडे- पाटील, उपायुक्त, नाशिक महापालिका
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.