आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यासमोर एक आदर्श:आवड आणि जिद्दीच्या जोरावर त्या 24 वर्षांनंतर झाल्या दहावी उत्तीर्ण

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षणाची आवड असली तरी ती वयाच्या कोणत्याही वर्षी साकार होऊ शकते. मात्र, त्यासाठी हवी असते, जिद्द आणि आवड. सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंप्री येथील अनिता उगले या महिलेने तब्बल शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण सोडल्यानंतर म्हणजे 24 वर्षानंतर यंदा दहावीच्या परिक्षेत उत्तीर्ण होवुन महिलांसमोर आणि अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

अनिता उगले यांनी 1998 पर्यंत सातवी पर्यंत शिक्षण घेतले. माध्यमिक शाळा ही बाहेरगावी असल्याने इच्छा असतानाही शिक्षण घेता आले नाही. नंतर त्यांचे सन 2000 मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यानंतर त्यांना तीन अपत्य झाली. मात्र, अवघ्या सात वर्षाच्या सुखाच्या संसाराला नजर लागली आणि त्यांच्या पतीचे निधन झाले. मात्र, या दुखातुन सावरत त्यांनी दोन महिन्याच्या मुलासह तीन्ही मुलांची जबाबदारी खांद्यावर घेत संसाराची गाडी चालविण्यास सुरुवात केली.

कधी शेतमजुरी, तर कधी बिगारी काम करण्याला प्राधान्य दिले. मुलांसोबत सासु सासरे यांच्या सांभाळ देखील करु लागल्या. मुलांना बारागाव पिंप्री येथे न्यु इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शाळेत घातले. यावेळी अनिता उगले यांनी शेतमजूरी सोडत शाळेमध्ये मध्यान्ह भोजन योजनेत मदतनीस म्हणून काम करु लागल्या. स्वभाव चांगला आणि बोलणे गोड असल्याने तसेच त्यांचा प्रामाणिकपणा बघुन प्राचार्य अशोक बागुल यांच्या सहकार्याने संस्थेने त्यांची चतुर्थ कर्मचारी म्हणून मानधनावर नियुक्ती केली. त्यामुळे आता प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसोबत संपर्क होवु लागला.

रात्री अभ्यासाचा पाडा

विद्यार्थ्यांची शिकण्याची जिद्द, खेळणे बागडणे बघुन अनिता यांचीही पुन्हा रखडलेले शिक्षण पुर्ण करण्याची इच्छा जागृत झाली. इच्छा आहे, पण ती सांगायची कोणाला कारण स्वतः ची मुले नववी व दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होते. परंतू शिक्षण घ्यायचेच ही इच्छा सतत सतावू लागली होती. अखेर त्यांनी विद्यालयाचे प्राचार्य अशोक बागुल यांच्याकडे शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. बागुल यांनीही त्यांच्या जिद्दीला सलाम करीत सकारात्मक निर्णय घेतला. शाळेतील कर्मचाऱ्यांना सुचना देवुन उगले यांचा 17 नंबर फॉर्म भरण्यासाठी सांगितले. आर्थिक परिस्थिती नसल्याचे शिक्षकांना माहिती असल्याने यावेळी शाळेचे इन्चार्ज श्री. गुंजाळ यांनी परीक्षा फी सह इतर मदत केली. अभ्यासाला जोरदार सुरुवात केली.

दिवसा संसाराचा गाडा तर रात्री अभ्यासाचा पाडा सुरु ठेवला. परिक्षा आली, परिक्षा झाली. आता वेळ होती निकालाची. ज्याप्रमाणे निकालाच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या मनात भिती असते, तशी यांच्याही मनात भिती होती. मात्र गुणपत्रक हातात आले अन अनिता उगले या पहिल्याच प्रयत्नात दहावी उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या या जिद्दीमुळे विद्यार्थी अन इतर महिलांसमोर एक आदर्श निर्माण झाला.

बातम्या आणखी आहेत...