आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाययाेजना:अपघात राेखण्यासाठी 28 ब्लॅकस्पॉटवर गतिराेधक

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिर्ची चौकातील बस दुर्घटनेनंतर जागे झालेल्या जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्त यांच्यासारख्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील ट्रॅफिक सेलने अर्थातच रस्ते सुरक्षा समितीने सुचवल्याप्रमाणे शहरातील २८ अपघाती ठिकाणांवर अर्थातच ब्लॅक स्पॉटवर गतिरोधक बसवण्याची कार्यवाही करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बांधकाम विभागाला दिले आहेत. या संदर्भात काम पुढे जात नसल्यामुळे खाते प्रमुखांच्या बैठकीत त्यांनी बांधकाम विभागाची कान उघडणीही केली.

१० नोव्हेंबर रोजी प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या ट्रॅफिक सेलच्या बैठकीत मिर्ची हॉटेल चौकातील बस दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरातील विविध अपघात स्थलांचे सर्वेक्षण करून ठोस उपाययोजनांबाबत चर्चा झाली होती. दृश्यमानता महत्त्वाची असल्याचे सांगून चौकातील सूचना फलक त्यांचे ठिकाण, रंग डिझाइन निश्चित करणे, विविध ठिकाणी वाहतूक नियोजन व पेट्रोलींगच्या दृष्टीने पोलिस चौक्यांची ठिकाणे, डिझाइन, मिर्ची चौकातील टेम्पलेट याबाबत रेझिलिइन्ट कंपनीच्या तज्ञांनी अहवाल द्यावा त्यावर त्वरीत काम केले जाईल, असे सांगितले.

तसेच रेझिलिइन्ट इंडीया कंपनीचे राजीव चौबे यांनी सायंटीफिक स्टडी करुन पंधरा दिवसात अपघाती स्थळांचे सर्व्हेक्षण करुन आवश्यक उपाययोजनासंबंधिचा अहवाल सादर करा अशाही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राष्ट्रीय तसेच राज्य महामार्ग व महापालिकेच्या रस्त्यांवर असलेल्या ब्लॅक स्पॉटवर पहिल्या टप्प्यात गतिरोधक बसवले जाणार आहेत.

६० किमी प्रति तास वेगामुळे मृत्यूचे प्रमाण ९५ टक्के
वाहनांची वेगमर्यादा ३०ची असेल तर अपघातातील मृत्यूचे प्रमाण दहा टक्के असते. मात्र वेग ६० किलोमीटर प्रति तास असेल तर मृत्यूचे प्रमाण ९५ टक्के असते. विना हेल्मेटमुळेही मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली होती.

नऊ महिन्यांत १०८ जणांचा बळी
जानेवारी ते सप्टेंबर २०२२ या नऊ महिन्यांच्या कालावधीत शहरात झालेल्या अपघातांची आकडेवारी या बैठकीत सादर करण्यात आली. त्यात वेगात वाहन चालविल्यामुळे १८६ अपघात घडले असून त्यात ६० जणांचा बळी गेला आहे. तर, हेल्मेट परिधान न केल्यामुळे झालेल्या दुचाकी अपघातांमध्ये ४८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.

येथे उभारणार गतिरोधक
एबीबी सिग्नल, सकाळ सिग्नल, शरणपूर रोड सिग्नल, वेद मंदिर चौक, बळी मंदिर, रासबिहारी चौफुली, शिंदे गाव शिवार, द्वारका सर्कल, फेम सिग्नल, राहू हॉटेल सिग्नल, के. के. वाघ महाविद्यालय सिग्नल, जत्रा हॉटेल चौफुली, उपनगर नाका सिग्नल, चेहडी गाव फाटा, दत्त मंदिर सिग्नल, पळसे गाव बस स्टॉप, ट्रक टर्मिनल, आडगाव, तपोवन क्रॉसिंग, स्वामीनारायण चौफुली, जुना गंगापूर नाका, नांदूर नाका, मिर्ची हॉटेल सिग्नल, तारवाला नगर सिग्नल, गडकरी चौक सिग्नल, एक्स लो पॉइंट, एमआयडीसी सातपूर, सिद्धिविनायक चौक, कार्बन नाका, सीबीएस

लवकरात लवकर गतिरोधक बसवणार
ट्रॅफिक सेलच्या बैठकीतील निर्देशाप्रमाणे पहिल्या टप्प्यात शहरातील २८ प्रमुख ब्लॅक स्पॉटवर गतिरोधक बसवले जाणार आहे. जेणेकरून वाहनांच्या वेगावर नियंत्रण प्रस्थापित होऊन अपघातांना आळा बसू शकेल. - शिवकुमार वंजारी, शहर अभियंता

बातम्या आणखी आहेत...