आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा शहरातील २० लाख लाेकसंख्येच्या ताेंडचे पाणी पळवण्याचे प्रकार वारंवार घडत असून याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर हाेणारी टीका माेडीत काढण्यासाठी थेट महावितरणला पत्र पाठवून त्यांचा कारभार उघड करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात २८ दिवसांत जवळपास ६१ वेळा अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. धरणातून जलकुंभापर्यंत तर जलकुंभाचा वीजपुरवठा खंडित झाल्यास तळापर्यंत पाणी पाेहाेचत नसल्यामुळे पालिकेने अचानक वीजपुरवठा खंडित करू नये, किमान कळवण्याची तसदी घ्यावी, असा विनंतीवजा इशाराही दिला आहे. गेल्या काही महिन्यांत नाशिक शहरातील पाणीपुरवठा अचानक विस्कळीत हाेत आहे. सिडकाेसारख्या भागात तर दाेन-दाेन दिवस पाणी येत नसल्याचे प्रकार घडले आहे. बऱ्याचवेळा पाणीपुरवठा विस्कळीत हाेण्यामागे जुन्या जलवाहिन्या कारणीभूत ठरतात.
त्यामुळे आधीच मनपाला नागरिकांचा राेष सहन करावा लागत आहे. अशातच, आता, महावितरणमुळे वीजपुरवठा खंडित हाेण्याचे प्रकार वाढले आहे. महापालिकेचे गंगापूर, मुकणे, दारणातील चेहेडी धरणासह पाच ठिकाणी पंपिंग स्टेशन आहे. याव्यतिरिक्त सहा ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र आहे. धरणातून पंपिंग स्टेशनद्वारे जलकुंभ तर जलकुंभावरून पाणीपुरवठा नागरिकांपर्यत केला जाताे. नेमक्या याच ठिकाणी वीजपुरवठा अचानक खंडित झाला तर पाणी वितरण ठप्प हाेते. फेब्रुवारी महिन्यात गत २८ दिवसात ६१ वेळा वीजपुरवठा अचानक खंडित झाला. त्यामुळे पालिकेला पाणीपुरवठ्यात अडचण आली.
पालिकेने दिलेल्या पत्राचा असा आहे आशय...
गंगापूर धरण, चेहेडी पंपिंग, मुकणे धरण, गोपाळनगर व बोरगड या ठिकाणी पंपिंग स्टेशन्स आहेत. तसेच बाराबंगला, शिवाजीनगर, विल्होळी, नाशिकरोड, गांधीनगर, निलगिरी बाग या सहा ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र आहेत. या केंदांवर महावितरण कंपनीकडून सबस्टेशनद्वारे ३३ व ११ केव्ही एक्सप्रेस फीडरवरून वीजपुरवठा केला जातो. फेब्रुवारी महिन्यात मनपाच्या विविध पंपिंग स्टेशन व जलशुद्धीकरण केंद्र येथे वीजपुरवठा खंडित होत असून त्याबाबत जलशुद्धीकरण केंद्रास कुठलीही पूर्वसूचना महावितरण कंपनीकडून दिली जात नाही. परिणामी संबंधित केंद्रांवरून होणारा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत हाेत आहे. वीजपुरवठा वारंवार खंडित हाेत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होऊन मशिनरी वारंवार चालू बंद होत असल्याने मशिनरीच्या कार्यक्षमतेवर देखील परिणाम होऊन मशिनरी व उपकरणांचे नुकसान होत आहे.
अचानक वीजपुरवठा खंडित करू नये
फेब्रुवारी महिन्यात पंपिंग स्टेशन व जलशुद्धीकरण केंद्र मिळून ६१ वेळा वीजपुरवठा खंडित झाला आहे. पूर्वसूचना दिल्यास स्वतंत्र व्यवस्था करता येऊ शकेल. - अविनाश धनाईत, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.