आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकरवसुलीसाठी आता महापालिकेने आक्रमक पवित्रा घेतला असून घरपट्टी-पाणीपट्टीपाठोपाठ ६२ व्यापारी संकुलातील २९४४ गाळेधारकांना थकबाकी वसुलीसाठी नोटिसा दिल्या जाणार आहे. यातील साधारण ५० टक्के गाळेधारक थकबाकीदार असून, त्यांच्याकडून दोन कोटी ९८ लाख रुपयांची वसुली होणे अपेक्षित आहे. थकबाकीदारांना नोटीस देणे, वसुली न केल्यास गाडी जप्त करणे अशी कारवाई मार्च महिन्यापर्यंत केली जाणार आहे.
त्यासाठी शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशीही सहाही नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवले जाणार आहे.पालिकेच्या मालकीच्या ६२ इमारतीमध्ये २९४४ गाळेधारक असून त्यातील ५६ व्यापारी संकुलातील १७३१ गाळ्यांची मुदत २०१४ व २०१५ मध्ये संपुष्यात आल्याने या गाळ्यांच्या फेरलिलावाचा प्रस्ताव तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्थायीच्या मान्यतेसाठी सादर केला होता. विरोध झाल्यानंतर स्थायीने हा प्रस्ताव महासभेच्या दिशेने टोलावला होता. १४ ऑक्टोबर २०१६ रोजीच्या महासभेत हा प्रस्ताव फेटाळून लावत गाळेधारकांना १५ वर्षांची मुदतवाढ देण्याचा व शासकीय मूल्यांकन दरानुसार त्यांच्याकडून भाडेवसुलीचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला हरकत घेत गाळेधारकांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती.
सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यापासून गाळेधारकांनी पालिकेचे भाडे भरले नसल्याने प्रशासनाने कायदेशीर सल्ला मागविला होता. त्यानुसार गेल्या वर्षी भाडेवसुली कोणत्या दराने करायची याचा निर्णय जिल्हा न्यायालयाच्या अंतिम निकालानंतरच घेण्याचे ठरले. मात्र, शासन नियमानुसार ४ जानेवारी २०१७ ते १२ सप्टेंबर २०१९ या कालावधीतील गाळ्यांची आकारणी आयुक्तांच्या ४ जानेवारी २०१७ रोजीच्या आदेशानुसार शासकीय मूल्यांकन दरानुसार करण्याचा निर्णय घेतला गेला.अशा नानाविध कारणांमुळे थकबाकीचा आकडा वाढत असून पालिकेने आता मार्चपासून कर वसुलीसाठी मोहीम तीव्र केली आहे. विविध कर विभागाने आता सुमारे एक हजाराहून अधिक गाळेधारकांना थकबाकी वसुलीसाठी नोटिसा पाठवल्या आहेत.
उच्चभ्रू पश्चिम विभागात दीड कोटीची थकबाकी
पालिकेच्या मालकीच्या पश्चिम विभागामधील कॉलेजरोड, शरणपूररोड, गंगापूररोड, आनंदवल्ली या भागामध्ये प्रचंड महत्त्व आहे. या भागामध्ये रेडीरेकनरचा दर अधिक असल्यामुळे येथील गाळ्यांनाही चांगली मागणी आहे. नासिक पश्चिम विभागातील कोटी ५५ लाख ५५ हजार रुपयांची थकबाकी येणे असून त्याखालोखाल पंचवटीमध्ये ३६ लाख ३२ हजार, सातपूरमध्ये ३० लाख २९ हजार, नाशिकरोडमध्ये ३० लाख ४९ हजार तर नाशिक पूर्व विभागात ४२ लाख रुपये येणे बाकी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.