आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकीत घरपट्टी जमा:ढाेल बजाव ; पहिल्याच दिवशी 35 लाख वसूल

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे एक लाखाच्या पुढे थकबाकी असलेल्या घरपट्टी थकवलेल्या मालमत्ताधारकांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन पुन्हा एकदा दिवाळीनंतर सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी सुमारे ३५ लाख ४५ हजार रुपयांची वसुली झाली. गेल्या १४ दिवसांत दिवाळी सुटीचा कालावधी वगळता सुमारे पाच कोटींची वसुली झाली असून आर्थिक खडखडाटाचा सामना करणाऱ्या पालिकेला मोठी उभारी मिळाली आहे.

गेल्या दोन वर्षांत पालिकेतील सत्ताधारी भाजपने ‘होऊ द्या खर्च’ असे धोरण अवलंबल्यामुळे जुन्या कामांचे देणे जवळपास दोन हजार कोटींपेक्षा अधिक आहे. दुसरीकडे पालिकेला कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत घरपट्टी व पाणीपट्टीची अपेक्षित वसुली करता आली नाही. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा फरक देणे, दिवाळीत ठेकेदारांची देयके देणे, सानुग्रह अनुदान अशा विविध कामांमुळे जवळपास दीडशे कोटींचा बोजा आला.

ही बाब लक्षात घेत आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशानुसार कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली १८ ऑक्टोबरपासून एक लाखाच्या पुढे असलेल्या थकबाकीदारांच्या घरासमोर किंवा आस्थापनांसमोर ढोल वाजविण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आलेली आहे. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात सव्वाचार कोटींपेक्षा अधिक वसुली झाली. एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त थकबाकी असलेले एकूण १२५८ थकबाकीदार आहेत.

नाशिकरोडमधून सर्वाधिक १५ लाखांची वसुली : १ नोव्हेंबर रोजी एकूण ३५ लाख ४५ हजार ८९ रुपये रुपयांची करवसुली झाली आहे. नाशिकरोड विभागात सर्वाधिक १५ लाख ४९ हजारांची वसुली झाली आहे. सहा विभाग मिळून एकूण ७२ ठिकाणी ढोल वाजविण्यात आले.

थकबाकी भरा; कटू कारवाई टाळा
घरपट्टी, पाणीपट्टीची थकबाकी भरावी. चालू वर्षीचा कर भरून नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे. जे कर भरणार नाहीत. त्यांच्या घर, आस्थापनांसमोर ढोलपथक ढोल वाजवणार आहे. वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत ही मोहीम सुरू राहील. - अर्चना तांबे, उपायुक्त, मनपा

बातम्या आणखी आहेत...