आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

494 प्रकल्पांचे सादरीकरण:आंतरविद्यापीठ ‘आविष्कार’ स्पर्धेतील 24 विजेत्यांना 35 हजारांची फेलोशिप

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांमधून संशाेधक शाेधता यावे यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत ‘आविष्कार’ स्पर्धा झाली. स्पर्धेच्या विभागीयस्तर फेरीत नाशिक जिल्ह्यातून ४९४ प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. केटीएचएम महाविद्यालयात २७० स्पर्धकांनी आपले नावीन्यपूर्ण संशोधन प्रकल्प सादर केले. तर ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात २१४ प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. आंतरविद्यापीठ स्पर्धेत सहा विषयांमधून प्रत्येक गटात एकूण चार याप्रमाणे अंतिम २४ प्रकल्पांना ३५ हजारांची फेलोशिप दिली जाणार आहे. नावीन्यपूर्ण संशोधन प्रकल्प व विविध संकल्पनांवर आधारित पोस्टर सादरीकरण यामध्ये केले गेले.

नाशिकमध्ये घेण्यात आलेल्या विभागीयस्तर फेरीच्या आयोजनाप्रसंगी पुणे विद्यापीठ आयक्यूएसी संचालक डॉ. संजय ढोले, प्राचार्य मोहन वामन, प्रा. शंकर लवारे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे होते. प्राचार्य डॉ व्ही. बी. गायकवाड, आयक्यूएसी समन्वयक डॉ. एन. डी. गायकवाड, स्पर्धा समन्वयक डॉ. एम. पी. नलावडे आदी उपस्थित होते. डॉ. संजय ढोले यांनी सांगितले की, २००६ पासून स्पर्धा सुरू झाली. यामध्ये महाविद्यालयस्तरानंतर विभागीयस्तर आणि त्यानंतर विद्यापीठस्तरावर स्पर्धेचे आयोजन केले जाते. परीक्षक म्हणून डॉ. आशा ढोके, अपूर्वा जाखडी, डॉ. शंकर लवारे, प्राचार्य डॉ. मोहन वामन, प्रा. सोनाली पवार, डॉ. उमेश लढ्ढा व डॉ. तुषार पाटील उपस्थित होते. आभार डॉ. गणेश मोगल यांनी तर सूत्रसंचालन डॉ. तुषार पाटील यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ९ वेळा विजेते आविष्कार स्पर्धेत १४ पैकी ९ वेळा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विजेतेपद तर ५ वेळा उपविजेतेपद पटकावले आहे. यंदाही विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने नावीन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण केले आहे. जानेवारी २०२३ मध्ये राज्यस्तरीय स्पर्धा पुणे विद्यापीठाच्या आवारात होणार आहेत.

या विषयांवर सादर प्रकल्प मानव संसाधन, कला, साहित्य, कृषी, फार्मसी, प्राणीशास्त्र, मेडिकल, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या विषयांमध्ये ७ केंद्राद्वारे एकूण ३ हजार विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केले. कृषी प्रकल्पात आधुनिक ठिबक सिंचन, साैरऊर्जेचा अधिकाधिक वापर कसा करावा याचे सादरीकरण व त्या संदर्भात जनजागृती ‌करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...