आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्यदेव कोपले:राज्यामध्ये उष्माघाताने घेतले 4 बळी; मराठवाड्यात 2 तर नाशिक जिल्ह्यात 2 मृत्यूमुखी

प्रतिनिधी | नाशिक, छत्रपती संभाजीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सूर्यदेव कोपले असून राज्यात विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगावात उष्णतेची लाट कायम आहे. विदर्भासह राज्यात रविवारी (१४ मे) देखील उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे. राज्यात शनिवारी (१३ मे) अकोल्यात सर्वाधिक ४५.६ अंश तापमान नोंदवले गेले.

उष्णतेच्या लाटेत छत्रपती संभाजीनगर, नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी एक-एक तर नाशिक जिल्ह्यात दोन बळी गेले. राज्यात गेल्या चार दिवसांपासून उष्णता वाढली असून गुरुवारी आणि शुक्रवारी उष्णतेची लाट होती. शनिवारी काही भागांत उन्हाची तीव्रता कमी झाली असली तरी, विदर्भात मात्र सूर्य तळपला होता. विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान हे ४० ते ४५ अंशाच्या दरम्यान होते.

भरदुपारी शेतावर काम केल्याने उष्माघात

मराठवाड्यात नांदेड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उष्माघाताने दोन जणांना जीव गमवावा लागला. १२ मे रोजी हिमायतनगर येथील विशाल रामराव मादसवार (२८) व पैठण तालुक्यातील आडूळ बु. येथील तातेराव (बंडू) मदन वाघ (३८) यांचा मृत्यू झाला. नाशिक तालुक्यात शनिवारी राहुरी येथील शेतकरी साहेबराव शांताराम आव्हाड(५५) आणि अकोला येथील ट्रकचालक अकबर शहा मेहबूब शहा (५३) यांचा मालेगाव येथे उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अकोल्यात सर्वाधिक ४५.६ अंश तापमानाची नोंद अकोला ४५.६, जळगाव ४५.०, परभणी ४४.७, अमरावती ४४.६, वर्धा ४४.१, मालेगाव ४३.८, सोलापूर ४३.३, नांदेड ४३.२, बीड ४३.०, यवतमाळ ४३.०, जालना ४२.८, नागपूर ४२.७, छत्रपती संभाजीनगर ४१.८, गडचिरोली ४१.६, अहमदनगर ४१.४, बुलडाणा ४१.२, नाशिक ३८.६, पुणे ३८.०, सांगली ३७.६, ठाणे ३७.०, कोल्हापूर ३५.१, कुलाबा) ३४.६.