आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाची पुढील कोणतीही लाट येण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे महापालिकेने आता तपोवन, समाजकल्याण वसतिगृह पाठोपाठ अंबड, मीनाताई ठाकरे स्टेडियम, संभाजी स्टेडियम, ठक्कर डोम येथील कोविड सेंटर्स गुंडाळले असून या कोविड सेंटरमधील रुग्णांकरिता कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले आॅक्सिजन प्लांट आता भांडारात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच येथील वीज मीटर देखील विद्युत विभागाकडे हस्तांतरित केले जाणार आहे. नाशिकमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आॅक्सिजन कमतरतेमुळे अनेकांचा जीवही गेला.
शहरात दिवसाला १०० मे. टन आॅक्सिजनची गरज भासत होती. यासाठी महापालिकेने कोविड सेंटर्सच्या ठिकाणी हवेतून आॅक्सिजन शोषून घेणारे स्वत:चे २३ आॅक्सिजन प्लांट उभारले होते. त्यात झाकीर हुसेन व बिटकाे रुग्णालयात सर्वात मोठे प्रकल्प होते. पाठोपाठ ठक्कर डोम येथील ३२५ खाटांच्या कोविड सेंटरसाठी ६०० लिटर प्रति मिनिट क्षमतेचे तीन, मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे ५०० लिटर प्रतिमिनिट क्षमतेचे दोन, संभाजी स्टेडियम येथील ३०० खाटांच्या कोविड सेंटरकरिता ५०० लिटर प्रति मिनिट क्षमतेचे दोन तसेच अंबड येथील ५०० खाटांच्या कोविड सेंटरकरिता ५०० लिटर प्रतिमिनिट क्षमतेचे तीन आॅक्सिजन प्लांट उभारण्यात आले होते.
दैनंदिन मागणीच्या तिप्पट अर्थातच २४४ मे.टन प्रतिदिनपर्यंत आॅक्सिजन निर्मितीची क्षमता वाढविली होती. सध्या, जेमतेम एकच कोरोना रुग्ण उपचार घेत आहे. त्यामुळे महापालिकेने खासगी ठिकाणी उभारलेले कोविड सेंटर्स गुंडाळले असून येथील आॅक्सिजन प्लांट हटवून ते महापालिकेच्या भांडार विभागात जमा केले जाणार आहेत. वास्तविक, हे आॅक्सिजन प्लांट महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रांमध्ये उपयोगात आणण्याचा प्रयत्न होता मात्र मलनिस्सारण विभागाने हा प्रस्ताव नाकारल्यामुळे आॅक्सिजन प्लांट भांडार विभागात जमा केले जाणार आहे. एकदाही वापर न केलेले अंबड कोविड सेंटरही गुंडाळणण्याची तयारी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.