आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी ग्राउंड रिपाेर्ट:दाहक वास्तव : नाशकात 40 वर मृतदेह ‘वेटिंग’मध्ये, शवागारे भरली; अंत्यसंस्कारांच्या प्रतीक्षेत कोरोना मृतदेह बेडवरच

नाशिक / भूषण महाले2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंत्यविधीसाठीची प्रतीक्षा यादी मोठी असल्यामुळे खासगी रुग्णालयात प्लास्टिक वेष्टनात गुंडाळून ठेवलेला एक मृतदेह.
  • मृतदेह दहनास सुरुवात, दुसरी विद्युतदाहिनीही सुरू केली जाईल

नाशिक स्मशानभूमीतील गॅस दाहिनीचा पट्टा तुटल्यामुळे तब्बल ४० वर मृतदेह अंत्यविधीच्या प्रतीक्षेत आहेत. एक मृतदेह दहनासाठी सरासरी दीड ते दाेन तास लागत असल्यामुळे नव्याने येणाऱ्या मृतदेहाच्या दहनासाठी २ ते ३ दिवस लागतील, असे उत्तर ‘अमरधाम’कडून मिळत आहे. हे ‘वेटिंग’ नेमके किती, याची माहिती खुद्द पालिकेच्या आराेग्य अधिकाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही नसल्याचे ‘दिव्य मराठी’च्या पडताळणीत समाेर आले.

आराेग्यधिकारी डाॅ. कल्पना कुटे यांच्या मते दुपारी १ वाजेपर्यंत साधारण ३७ इतके वेटिंग हाेते. याच वेळी अमरधाम नाेंदणी कक्षाला फाेन केल्यानंतर नव्या मृतदेहाच्या दहनासाठी ४३ प्रतीक्षा क्रमांक मिळेल, असे उत्तर देण्यात आले. अंत्यविधीस जागा नाही, शवागारे पूर्ण भरलेली अशा स्थितीत हाॅस्पिटलमध्ये मृतदेह ठेवायचे की, येणाऱ्या रुग्णांना बेड देऊन उपचार करायचे, असा प्रश्न रुग्णालयांसमाेर आहे. विद्युतदाहिनीत एका मृतदेहाच्या दहनासाठी दीड ते दाेन तास लागत आहेत. सलग २४ तास दहन केले तरी जास्तीत जास्त १२ ते १३ मृतदेहांचे दहन होऊ शकते. त्यामुळे प्रतीक्षा क्रमांक ४० असेल तरी दहनासाठी तीन दिवस लागणार असल्यामुळे मृतदेह ठेवायचा कुठे, असा प्रश्न आहे.

मृतदेह दहनास सुरुवात, दुसरी विद्युतदाहिनीही सुरू केली जाईल
ही बाब कानावर आल्यानंतर तातडीने गॅस दाहिनी सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सरणावर मृतदेह दहन करण्यासही सुरुवात केली आहे. अंत्यविधीसाठी प्रतीक्षा करावी लागू नये यासाठी दुसरी विद्युत दाहिनीही सुरू केली जाईल. अमरधाममध्ये काेराेना मृतांसाठी ८ दाहिन्या राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या . - कैलास जाधव, आयुक्त, नाशिक

मृतदेह ठेवायचे काेठे?
जिल्हा रुग्णालय, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय व मराठा विद्या प्रसारक समाजाच्या मेडिकल कॉलेजमध्ये शवागार आहे. जिल्हा रुग्णालयाच्या शवागारातील काही शीतपेट्या नादुरुस्त आहेत. डाॅ. हुसेन रुग्णालयात ३ शीतपेट्या असून दूरवरच्या मविप्र शवागारापासून मृतदेहांची ने-आण करणे धाेकादायक असल्यामुळे मृतदेह ठेवायचे कुठे, हा प्रश्न आहे. परिणामी उपचार सुरू असलेल्या रुग्णालयाच्याच काेपऱ्यात मृतदेह ठेवण्याची वेळ डाॅक्टरांवर आली आहे.