आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोदावरी शुद्धीकरणासाठी पहिल्या टप्प्यात महापालिका स्वत:च्या खर्चाने रामकुंडापर्यंत स्वच्छ व निर्मळ पाणी आणण्यासाठी तयार केलेल्या ४० कोटी रुपयांच्या दहा कलमी कार्यक्रमाला आयुक्त रमेश पवार यांच्या बदलीनंतर ब्रेक दिल्याचे वृत्त आहे. लेखाधिकाऱ्यांनी मात्र नव्या आयुक्तांशी चर्चा बाकी आहे, असे कारण दिले असले तरी प्रत्यक्षात नूतन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आपणच आर्थिक शिस्त लावण्याच्या दृष्टिकोनातून परस्पर कोणत्याही निधीच्या तरतुदी न वळवण्याच्या सूचना दिल्याचे कारण सांगितले आहे. अनावश्यक ५५ कोटी रुपयांची मलनिसारण योजनेची कामे कमी केल्यानंतर संबंधित ठेकेदारांच्या कथित दबावामुळेही हा कार्यक्रम अडगळीत जाण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा गाजत असून त्यासंदर्भात उच्च न्यायालयामध्ये देखील कायदेशीर लढाई सुरू आहे. शहरातून गोदावरी नदी साधारण १९ किलोमीटर अंतरांवरून वाहते. त्यात गंगापूर गाव, सोमेश्वर मंदिर ते अहिल्याबाई होळकर पूल, अहिल्याबाई होळकर पूल ते कन्नमवार पूल आणि कन्नमवार पूल ते दसकपासून पुढील भाग असे तीन प्रमुख टप्पे आहेत. संपूर्ण गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी ‘नमामि गोदा’ अंतर्गत १८२३ कोटी रुपयांचा निधी येणे क्रमप्राप्त आहे. मात्र, आयुक्त पवार यांनी पालिकेच्या स्तरावर रामकुंडापर्यंतच्या परिसरात दहा कलमी कार्यक्रम राबवून सहज प्रदूषणमुक्त करता येऊ शकते, असे गणित मांडले. त्यानुसार सर्वप्रथम पावसाळी गटारीला जाेडलेल्या सांडपाण्याचे कनेक्शन खंडित करण्याचे कामकाज सुरू झाले. त्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये सात कामांची निवड करून त्यासाठी जवळपास ४० कोटी रुपयांच्या योजना प्रस्तावित केल्या गेल्या. त्यासाठी अंदाजपत्रकात निधी शिल्लक नसल्याने जुन्या कामांचे दायित्व वजावट करून लेखा विभागांमध्ये नवीन कामांची फाइल मलनिस्सारण विभागाने पाठवली. मात्र या विभागाकडून फाइल अंतिम होऊन अंतिम मंजुरीसाठी जाणार तोच तत्कालीन आयुक्त पवार यांची बदली झाली व गेल्या पंधरा दिवसांपासून ही फाइल लेखा विभागातच धूळखात पडून आहे. यासंदर्भात लेखाधिकारी नरेंद्र महाजन यांना विचारले असता त्यांनी तत्कालीन आयुक्तांची बदली झाल्यानंतर नियुक्त झालेल्या नवीन आयुक्तांशी चर्चा बाकी असल्याचे सांगितले. नवीन आयुक्तांचे नियुक्ती होऊन पंधरापेक्षा अधिक दिवस झाले असून जुन्या कामाशी संबंधित काही ठेकेदारांचा कथित दबाव असल्यामुळे गोदावरी प्रदूषणमुक्तीचा १० कलमी कार्यक्रम कपाटबंद होण्याची शक्यता आहे.
आढाव्यानंतरच मंजुरी
महापालिकेसारख्या संस्थेला आर्थिक शिस्त अत्यंत महत्त्वाची असून कोणताही निधी परस्पर न वळवण्याच्या सूचना मी पहिल्याच बैठकीत खातेप्रमुखांना दिल्या आहेत. त्यामुळे संबंधित प्रकल्पाबाबत लेखाधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर मी आर्थिक आढावा घेऊनच निर्णय घेईल असे सांगितले आहे.
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त, महापालिका
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.