आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असताना त्यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. शाळा सुरू होताच शैक्षणिक शुल्कात वाढ आणि महागड्या पुस्तकांच्या दणक्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या वाहतूक शुल्कातही मोठी वाढ करण्यात आली आहे.
शहरातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांच्या वाहतूक करणारे वाहन चालकांकडून या शुल्कात तब्बल 40 टक्के वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जवळच्या शाळेचे शुल्क ही 600 ते चक्क 900 व 1000 करण्यात आल्याने पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर सव्वाशे रुपये लिटरच्या जवळपास गेले आहेत. तसेच डिझेलनेही केव्हाच शंभरी पार केली आहे. त्यामुळे महागाईचा भडका उडाला असून, आता जवळपास सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. वाढत्या महागाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. महागाई वाढत असल्याने सर्वसामान्यांचे घर खर्चाचे बजेटही कोलमडून गेले आहे. त्यात आता दोन वर्षांनंतर सुरु झालेल्या शाळेचे खर्च ही वाढले आहेत. शालेय वाहतुकीचे दरातही प्रचंड वाढ झाल्याचे चित्र आहे. यामुळे सर्वसामान्यांना अधिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
इंधन दरवाढीमुळे दरात वाढ
इंधन दरवाढीमुळे मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. त्याचा फटकाही शालेय वाहतूक करणाऱ्यांनाही बसला आहे. कोरोनाच्या काळात दोन वर्ष शालेय वाहतूक या वाहतुकीशिवाय उभ्या होत्या. या दरम्यानचा देखभाल खर्चदेखील मोठा होता. त्यामुळेच शुल्क वाढीचा निर्णय घेतल्याचे शालेय वाहतूक करणार्या एका वाहनचालकांकडून सांगण्यात आले.
30 ते 40 टक्क्यांनी वाढ
विद्यार्थ्यांचा गणवेश, शालेय पुस्तके, वही व इतर खर्चात महागाईमुळे मोठी वाढ झाली आहे. त्यात आता शालेय वाहतूक करणार्या वाहनचालकांकडून शुल्कात वाढ करण्यात आली आहे. ६०० रुपयांवरुन थेट 900 रुपये शुल्क करणे चुकीचे आहे, अशा भावना पालक इम्तियाज शेख यांनी व्यक्त केल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.