आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्त विद्यापीठ:2 हजारांच्या पुनर्नोंदणी शुल्कापोटी 4000 विद्यार्थ्यांचे निकाल राखीव

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने पुनर्नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली खरी, पण आता पुनर्नोंदणी शुल्क २ हजार रुपये भरले नाही, म्हणून त्यांचे आॅगस्ट २०२१ चे निकाल मात्र राखून ठेवले आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी हितासाठी निर्णय घेतल्याचे दाखविले जात असताना प्रत्यक्षात मात्र ४ हजार विद्यार्थ्यांना २ हजार रुपये दिल्याखेरीज निकालपत्रक दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केल्याने आता या विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.

मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांसाठी विद्यापीठाने कालावधी निश्चित केला आहे. पण या कालावधीत अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणक्रम पूर्ण करता येत नाही, किंवा गत काही वर्षात अनेक विद्यार्थ्यांना तो परिस्थिती अभावी पूर्णही करता आला नाही. अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठाने पुनर्परीक्षा देण्याची अन् आपली पदवी पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून दिली खरी. त्यासाठी परीक्षा शुल्काचीही आकारणी केली. विद्यार्थ्यांनी हे शुल्क भरून परीक्षाही दिली. पण आता मध्येच विद्यापीठाने पुनर्नोंदणी प्रक्रियेचे कारण देत विद्यार्थ्यांना अडचणीत आणले आहे.

मुक्त विद्यापीठाने पुनर्नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार अभ्यासक्रम निश्चित वेळेत पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षा देण्याची एक संधी देण्यात आली आहे. बी.ए. आणि बी.काॅम शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांपैकी १६ अंकी कायम नोंदणी क्रमांक (पी.आर.एन.) असलेल्या ज्या विद्यार्थ्यांचा नोंदणी कालावधी संपलेला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी माहे आॅगस्ट २०२१ च्या परीक्षेच्या वेळी आॅनलाइन पद्धतीने २ हजार रुपये पुनर्नोंदणी शुल्क भरून नोंदणी करण्याची व विहीत परीक्षा शुल्कासह आॅनलाइनच पुनर्परीक्षा अर्ज करण्याची संधी देण्यात आली होती. परंतु अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरून पेपर दिले. पण पीआरएनचा कालावधी संपलेल्या विद्यार्थ्यांना २ हजार रुपये भरणे बंधनकारक केले आहे.

शुल्क भरल्याच्या पावतीभावी पुढील लिंक होईना उपलब्ध
पुर्ननोंदणी शुल्क भरल्याची पावती सादर केल्याशिवाय विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेची लिंकच उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे त्यांना पुढील प्रवेशही घेता येत नसल्याने विद्यार्थ्यांचे आता शैक्षणिक नुकसान होण्याचीही शक्यता वाढली आहे.

येथे पाठवा पावती
-babcomexam@ycmou.ac.in आणि nondani@ycmou.digitaluniversity.ac यावर २००० रुपयांचे शुल्क भरल्याची स्कॅन पावती सादर करण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

ही माहिती द्यावी
पूर्ण नाव, कायम नोंदणी क्रमांक (पीआरएन), शिक्षण क्रमाचे नाव व संकेतांक, शिक्षणक्रम वर्ष, अभ्यासकेंद्र नाव व संकेतांक, मोबाईल नंबर, परीक्षेचा महिना व वर्ष ही माहीती द्यावी लागेल.

पुनर्नोंदणी शुल्क हा तर विद्यापीठाचा नियमच, त्यानंतरच निकाल
विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांसाठी विशिष्ट कालावधी ठरलेला आहे. त्या निश्चित कालावधीत शिक्षण पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षेची संधी विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार पीआरएन नंबर असलेल्या अन् त्याची मुदत संपलेल्या विद्यार्थ्यांसाठीच २ हजार रुपये पुनर्नोंदणी शुल्क आहे. तो विद्यापीठाचा नियमच आहे. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांनी भरले त्यांना निकाल देतोय, ज्यांनी नाही भरले त्यांची प्रक्रिया सुरू असून, शुल्क भरताच निकाल दिले जातील. - भटूप्रसाद पाटील, परीक्षा नियंत्रक, मुक्त विद्यापीठ

बातम्या आणखी आहेत...