आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवस्थेची ऐशीतैशी:कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी नाशकात दिवसात आटोपल्या 41 शस्त्रक्रिया; शस्त्रक्रियेनंतर रुग्ण महिलांसाठी गरम पाण्याची व्यवस्थाही नाही

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुरेसे बेड नसल्याने स्तनदा मातांना शस्त्रक्रियेनंतर फरशीवरच अंथरूण टाकण्याची वेळ

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सूलजवळील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण नसबंदी शस्त्रक्रिया उद्दिष्टपूर्तीसाठी एकाच दिवसात तब्बल ४१ महिलांवर अवघ्या पाच तासांत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर वाॅर्डमध्ये अपुरी जागा असल्याने तसेच पुरेसे बेड नसल्याने फरशीवरच या महिलांना अंथरूण टाकावे लागले. त्यामुळे कोरोनाकाळात शारीरिक अंतर ठेवण्याच्या नियमाकडेही पूर्णपणे दुर्लक्ष झाले.

कोरोनाकाळामुळे मार्चपासून नसबंदी शस्त्रक्रिया बंद होत्या. परंतु, आता या महिन्यापासून राज्यात अनेक ठिकाणी त्या सुरू झाल्या आहेत. शासनाने कुटुंब कल्याण नसबंदी शस्त्रक्रियेचे दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिरसगाव व ठाणापाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात या शस्त्रक्रियांचे आयोजन करण्यात आले. कोरोनाकाळात अधिक खबरदारी घेऊन सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे असताना येथे मात्र स्तनदा माता व त्यांच्यासोबत असलेल्या बालकांचे आरोग्य धोक्यात टाकून त्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार दिसला. त्र्यंबकेश्वर तालुक्यात नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी एकच वैद्यकीय अधिकारी उपलब्ध आहे. त्यांनी पहाटे पाच ते सकाळी दहा या वेळेत ४१ नसबंदी शस्त्रक्रिया केल्या. त्यानंतर चार दिवस आरोग्य पथकाच्या निगराणीत महिलांना ठेवण्यात येते. मात्र, शिरसगाव येथे या महिलांची हेळसांड होत असल्याचे चित्र आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण महिलांसाठी गरम पाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती.

चौकशीचे दिले आदेश, अहवालानंतर कारवाई

शिरसगाव येथील प्रकार समजला असून मी तत्काळ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोतीराम पाटील यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. - डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी

कारवाई करावी

शिरसगाव व ठाणापाडा आरोग्य केंद्रात नसबंदीसाठी क्षमतेपेक्षा जास्त मातांना आणून त्यांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे. शासनाची उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या नादात स्तनदा मातांची हेळसांड करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. - रूपांजली माळेकर, जि. प. सदस्या, हरसूल गट

जि. प. सदस्या रूपांजली माळेकरांची मध्यरात्री भेट व मदत

हरसूल गटाच्या जिल्हा परिषद सदस्या रूपांजली माळेकर व सभापती मोतीराम दिवे यांना ही माहिती कळताच त्यांनी तातडीने बुधवारी मध्यरात्रीनंतर शिरसगाव व ठाणापाडा येथील आरोग्य केंद्रांना भेट दिली. त्या वेळी फरशीवर अंथरूण टाकून तेथे या महिला झोपलेल्या दिसल्या. त्यांच्यासोबत असलेली लहान बालके नातेवाइकांसोबत बाहेर ओट्यावर झोपलेली दिसली. त्यानंतर रूपांजली माळेकर यांनी त्यांना तत्काळ ५० ब्लँकेटसह पाणी व बिस्किटांचे वाटप केले. विनायक माळेकर, समाधान बोडके, युवा नेते मिथुन राऊत, हिरामण गावित, राहुल शार्दूल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...