आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइनरव्हील क्लब आॅफ नाशिकने प्राणायम आणि ध्यान हे सत्र घेऊन प्रौढ कैद्यांना (बंदिवान) त्यांच्या निरोगी मन आणि शरीरासाठी शिक्षित करण्याचे ठरवले आहेे. याशिवाय कारागृहातील वाचनालयासाठी पाच हजाराची ४५ पुस्तके भेट दिले असून बंदिवानांना वाचनाचे महत्त्व इनरव्हील क्लब पटवून देत आहे. त्याच प्रयत्नातून गुन्हेगारी विश्वातून बंदिवानांना बाहेर काढून तुरुंगातून सुटल्यावर सामान्य जीवन जगण्यासाठी प्राेत्साहित केले जात आहे. नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना योगाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी क्लबचे सदस्य कारागृहात गेले हाेते. क्लबच्या सदस्या योगगुरू शुभांगी सोनवणे यांनी सर्व कैद्यांना प्राणायाम आणि ध्यान यांची प्रात्यक्षिके दाखविली. ध्यान, प्राणायाम निरोगी रहायला आणि मन शांत ठेवण्यासाठी उपयुक्त कसे ठरते हे समजावून सांगत, प्राणायामचे प्रकार शिकविले. तुरुंगात प्रशासनातर्फे बंदिवानांना राेजगारही उपलब्ध करून दिला आहे.
मध्यवर्ती कारागृहाचे पोलिस अधीक्षक प्रमोद वाघ शिबिराला उपस्थित होते. ध्यान सत्रानंतर सदस्यांनी कैद्यांशी त्यांना ध्यानामुळे आलेल्या अनुभवाची चर्चा केली. यामुळे असे लक्षात आले की, त्यांना त्यांच्या मनासाठी आणि शरीरासाठी ध्यान आणि प्राणायामचे महत्त्व समजले. २०० कैद्यांनी या सत्राचा लाभ घेतला. बंदिवानांना वाचनाने नवीन दिशा मिळावी आणि त्यासाठी कारागृहाच्या वाचनालयात चार हजार ग्रंथ उपलब्ध आहेत.
त्याचा लाभ बंदिवानांनी घ्यावा, असे यावेळी कारागृहाचे अधीक्षक प्रमाेद वाघ यांनी मार्गदर्शन केले. क्लबच्या अध्यक्ष धारा मालुंजकर यांनी सासूबाई श्रीमती इंदुमती मालुंजकर यांच्या वाढदिवसानिमित्त ४५ विविध कथा आणि माहितीपूर्ण पुस्तके या वाचनालयाला भेट दिली. सचिव डॉ. ज्योत्स्ना पवार यांनी आभार मानले. पाेलिस उपअधीक्षक सचिन चिकणे, वरिष्ठ जेलर अशोक मलवाड, शिक्षक हेमंत पोद्दार या सत्राला उपस्थित होते. क्लबच्या श्रद्धा कोतवाल, शर्मिला मेहता, आशा घाडगे, प्रज्ञा गोखले, श्रद्धा कोतवाल आदी उपस्थित होत्या.
समाजासमाेर आदर्श
इनरव्हील क्लबच्या वतीने समाजातील वंचित घटकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. तसेच नागरिकानंा आराेग्याबाबत देखील जनजागृती केली जात आहे.
सामाजिक बांधिलकीतून घेतली जबाबदारी
प्रत्येक कैदी गुन्हेगार नसतो. कधी परिस्थिती त्याला अपघाताने गुन्हा करायला लावते. निर्दोष सिद्ध होईपर्यंत तुरुंगवास संपत नाही. आता त्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळत आहे, पण आयुष्यात काय करावे आणि काय करू नये हे सांगणारे कोणी नसेल तर ती जबाबदारी सामाजिक बांधिलकीतून आम्ही घ्यायला काय हरकत आहे? - धारा मालुंजकर, अध्यक्ष, इनरव्हील क्लब
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.