आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय खेळ:सहानुभूती शरद पवारांना; पकड अजितदादांची, नाशिकमध्ये 6 पैकी 5 आमदार दादांच्याच गटाचे!

प्रतिनिधी | भूषण महालेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शरद पवारांनी १८ जुलै १९७८ मध्ये पुरोगामी लोकशाही दल अर्थातच पुलोदचा प्रयोग केल्यानंतर त्यांना नाशिक जिल्ह्यातील १४ विधानसभा मतदारसंघातून आमदार निवडून देत भरभरून साथ देणाऱ्या नाशिकचा विचार केला तर, सध्यस्थितीत खासकरून ग्रामीण भागात सहानुभूती पवारांनाच आहे. मात्र राष्ट्रवादीच्या राजकारणावरील पकडीचा विषय झाला तर अजितदादांचे नाव येते. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार असून त्यात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा अपवादवगळता पाचही आमदार हे अजितदादा समर्थक मानले जातात. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बहुचर्चित पहाटेच्या शपथविधीलाही दोन आमदारांनी उघडपणे तर अन्य तीन आमदारांनी छुप्यापद्धतीने समर्थन दिल्याचे लपून राहीले नव्हते.

पवार व नाशिक असे समीकरण भक्कम असून त्यामुळेच १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर नाशिकमध्ये पक्षाची कमान कायम चढती राहिली. २२ वर्षात सर्वाधिक वेळा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच राहिले. त्यामुळेच आताच्या राजकीय स्थितीतही जिल्ह्यातील सर्व आमदार पवारांसोबत राहतील, असे चित्र दिसून आले.

पावसात भिजले अन‌् जिल्ह्यात सर्वाधिक ६ जागा जिंकल्या

२०१९ मध्ये पावसात भिजून भाषण केल्याचा परिणाम म्हणजे प्रतिकूल स्थितीत नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या सर्वाधिक सहा विधानसभेच्या जागा निवडून आल्या. शहरात भाजपाची लाट असताना पवारांमुळे ग्रामीण भागाशी नाळ जुळलेल्या पालिका क्षेत्रातील २४ खेड्यातील मतदारांनी राष्ट्रवादीला कौल दिला. भाजपाची दमछाक झाली. त्यावरून पवारांप्रति सहानभूती लक्षात येते. आताही तशीच परिस्थिती आहे.

भुजबळांचेही भावनिक नाते

भुजबळ यांचेही पवार यांच्याशी भावनिक नाते असल्याचे कायमच दिसले. २०१९ मधील निवडणुकीत ते शिवसेनेत जातील, असे चित्र होते. नांदगावची जागाही पंकज भुजबळ यांच्याकडून जाईल, असेही बोलले जात असताना पवार यांनी भुजबळ यांच्यावर विश्वास दाखवत दोन्ही जागी उमेदवारी दिली. ईडीच्या आरोपावरून भुजबळांना तुरूंगवास भोगावा लागल्यानंतरही अनेकवेळा पवार यांनी त्यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. भुजबळांना झुकते माप दिले जात असल्यामुळे कळत नकळत राष्ट्रवादीतील अन्य नेत्यांचा गट अजितदादांच्या जवळ गेल्याचीही चर्चा जिल्ह्यात सतत होत राहिली.

सामान्य नागरिकांना गरज

जनतेची, मोलमजुरी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे, की शरद पवार यांनीच पक्षाध्यक्षपदी कायम राहून मार्गदर्शन करावे, शेतकरी कष्टकऱ्यांना त्यांच्या नेतृत्वाची खरोखर गरज आहे. नरहरी झिरवाळ, उपाध्यक्ष, विधानसभा

भावनांचा विचार व्हावा

शरद पवार यांनी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री असताना घेतलेले निर्णय जनतेच्या हिताचेच होते, सर्व देश एक संघ रहावा यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी जनतेच्या भावनांची कदर करत निर्णयाचा फेरविचार करावा. -श्रीराम शेटे, उपाध्यक्ष, साखर संघ

निर्णय मागे घेण्याची विनंती

शरद पवार यांनी घेतलेला निर्णय दुर्देवी असून तो मागे घेण्याची विनंती सर्वच नेते व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आहे. -दिलीप बनकर, आमदार

राजीनामा मागे घ्या : नाशकातून ठराव

पवार यांच्या राजीनाम्याची बातमी आल्यानंतर शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नाना महाले, निवृत्ती अरिंगळे, बालम पटेल, संजय खैरनार तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. राजीनामा मागे घेण्याची मागणी करून तो ठराव करून प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्याचा निर्णय झाला.

दिल्लीतील महाराष्ट्राचा दबदबा कमी होईल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेत शरद पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. देशातील विविध पक्षांना एकत्र करण्याची ताकद ही केवळ त्यांच्यातच आहे. त्यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीचा आणि महाराष्ट्राचा दिल्लीतील राजकीय दबदबा कमी होईल. वयापरत्वे देश फिरण्यास त्रास होत असावा, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असावा. मात्र तो मागे घ्यावा, यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. -माणिकराव कोकाटे, आमदार