आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालना:किकवी धरणासाठी 50 कोटींची तरतूद; मुख्यमंत्र्यांचे सक्त आदेश

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या बारा वर्षांपासून विविध कारणांनी रखडत असलेल्या किकवी धरण प्रकल्पाला चालना मिळत असून येत्या बजेटमध्ये या प्रकल्पाच्या कामासाठी तातडीने ५० काेटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत. त्यामुळे नाशिककरांचा भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा आणि नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी हातभार लागणार आहे.

शहराचा विकास झपाट्याने हाेत असल्याने भविष्यात शहरवासीयांना पाणीटंचाईची भासू नये यासाठी किकवी धरणाचा पर्याय काही वर्षांपूर्वी पुढे आला हाेता. मात्र, विविध कारणांनी हा प्रकल्प अद्यापही रखडलेलाच आहे. यासाठी गेल्या काही वर्षांपासून खा. हेमंत गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्राह्मणवाडे शिवारातील प्रस्तावित किकवी धरणाचा विषय तातडीने मार्गी लावण्याचे तसेच येत्या बजेटमध्ये किकवी धरण उभारण्याच्या कामासाठी ५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचे आदेश मंगळवारी (दि. २२) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा विभागाचे राज्याचे सेक्रेटरी दीपक कपूर यांना तशा सूचना दिल्या आहेत.

खा. हेमंत गोडसे यांनी जलसंधारण विभाग तसेच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे सततचा पाठपुरावा करत किकवी धरणासाठी येत्या बजेटमध्ये किमान ५० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मागील आठवड्यात गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिवांना किकवी धरणाविषयीचा सविस्तर अहवाल पाठवत येत्या २०२२-२३ च्या आर्थिक बजेटमध्ये किकवी धरणासाठी ५० कोटींची तरतूद करण्याच्या मागणीचे पत्र पाठविले आहे. मुख्यमंत्र्यांना किकवी धरणाचे महत्त्व लक्षात आणून दिल्यानंतर मुख्यमंत्रांनी लगेचच जलसंपदा विभागाचे राज्याचे सेक्रेटरी दीपक कपूर यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला. प्रस्तावित किकवी धरणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा. धरणाच्या बांधकामासाठी येत्या बजेटमध्ये ५० कोटींच्या निधीची तरतूद करा अशा सूचनावजा आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी कपूर यांना दिला.

नाशिक शहराचा झपाट्याने होणारा विस्तार आणि शहराच्या लोकसंख्येत होणारी लक्षणीय वाढ लक्षात घेता गंगापूर, मुकणे, वैतरणा धरणातून होणारा पाणीपुरवठा भविष्यात कमी पडणार आहे. नाशिकला पाणी पाजणाऱ्या गंगापूर धरणातील वाढत्या गाळसाठ्यामुळे पाणीसाठा कमी होत आहे. गाळ साठल्यामुळे कमी झालेला पाणीसाठा पुनर्स्थापित करण्याच्या दृष्टीने गंगापूर धरणाच्या ऊर्ध्व बाजूला किकवी नदीवर त्र्यंबकेश्वर तालुक्यात बेझे गावाच्या परिसरात किकवी धरण उभारण्यासाठी समीर भुजबळ यांनी प्रयत्न केले होते. मात्र, त्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सातत्याने रखडला आहे.

बातम्या आणखी आहेत...