आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने राज्यांना देण्यात येणाऱ्या ईसीआरपी - इमर्जन्सी कोविड रिस्पॉन्स पॅकेजमधील ५० टक्के निधी महाराष्ट्र शासनाने वापरला नसल्याचा आरोप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केला आहे. या निधीतून राज्याला पहिल्या टप्प्यात ११८५.१२ कोटी, तर दुसऱ्यात ८२०.७७ कोटी रुपयांची तजवीज केंद्राने केली, मात्र राज्याने २१ सप्टेंबरपर्यंत फक्त ४१०.३९ कोटी रुपये खर्च केल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. राज्याच्या आरोग्य सचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी याबाबत बैठक घेतली.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यात केंद्र सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या ईसीआरपी - इमर्जन्सी कोविड रिस्पॉन्स प्रोग्राम - अंतर्गत देण्यात येणाऱ्या निधीच्या वापरात महाराष्ट्राला येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. कोविड केअर सेंटर्स, कोविड रुग्णालये, ऑक्सिजन बेड्स, आयसीयू बेड्स, टेस्टिंग किट्स या पायाभूत व अत्यावश्यक घटकांसाठी हा निधी तयार करण्यात आला आहे.
मार्चपर्यंत मुदत, आता फक्त दाेन महिने बाकी, आता उपचार करणार की व्यवस्था?
या निधीतून कोविडसाठीच्या अत्यावश्यक सुविधा उभ्या करणे अपेक्षित होते. मात्र, महाराष्ट्राने याचा फारच कमी उपयोग केला आहे. मार्चपर्यंतच याची मुदत आहे. त्यामुळे मी राज्याच्या आरोग्य सचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आरोग्यमंत्री टोपे यांनाही या बैठकीचे निमंत्रण दिले, मात्र अन्य कामामुळे ते सहभागी होऊ शकले नाही. राज्य निधीचा वापर करीत नसेल आणि केंद्र निधी देत नाही, अशी कोरडी ओरड करीत असेल तर ते योग्य नाही. - डॉ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.