आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांदवड बाजार समितीत लाल कांद्यास 5100 रु. उच्चांकी भाव:उन्हाळ कांद्यास सरासरी 1170 रुपये भाव मिळाला

चांदवड4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांदवड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर लाल कांद्याची आवक येण्यास सुरुवात झाली आहे. बाजार समितीत गुरुवारी लाल कांद्यास उचांकी ५१०० रुपये बाजारभाव मिळाले तर उन्हाळ कांद्यास सरासरी ११७० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाले. सर्वसाधारणपणे दिवाळीनंतर लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असते, मात्र यावर्षी अवकाळी पाऊस व ओल्या दुष्काळामुळे शेतकर्‍यांना लाल कांद्याचे उत्पादन घेण्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. याही परिस्थितीवर मात करुन शेतकर्‍यांनी उशिरा का होईना उत्तम दर्जाचे कांद्याचे उत्पादन घेतले आहे. गुरुवारी (दि. २४) चांदवड बाजार समितीत आसरखेडे येथील शेतकरी पवन पवार यांच्या नविन लाल कांद्यास प्रतीक्विंटल ५१०० रुपये बाजारभाव मिळाले. पुढील काही आठवड्यांमध्ये नविन लाल कांद्याच्या आवकेत वाढ होणार आहे, त्यामुळे आवक वाढून बाजारभाव कमी होण्याची चिंता शेतकर्‍यांना आहे. लाल कांद्याची टिकवण क्षमता कमी असल्याने काढणीनंतर लगेच विक्री करावा लागतो. त्यामुळे योग्य बाजारभाव मिळण्याच्या अपेक्षेने कांदा साठवून देखील ठेवता येणार नाही. परिणामी आवक वाढण्याची शक्यता आहे.

सद्यस्थितीत उन्हाळ कांद्याची नियमित आवक सुरु असून बाजारभावात सुधारणा झाली आहे. गुरुवारी उन्हाळ कांद्यास ४०० ते २१०० रुपये व सरासरी ११७० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाले. भुसार शेतीमालाची अंदाजे ३ हजार क्विंटलची आवक झाली असून मका शेतीमालास १७६५ ते २१११ रुपये व सरासरी १९७० रुपयांपर्यंत व सोयाबिनला ३ हजार ते ५५०० रुपये व सरासरी ५३०० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाले. मका व सोयाबिनसोबतच मुग व हरभरा आदी शेतीमालाची देखील बाजार समितीत आवक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...