आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पीक विमा:राज्यभरातील 60 लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता; मुदत 31 जुलैपर्यंतच, शासन निर्णयास विलंब

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यंदा शासन आदेश उशिरा, आतापर्यंत 33 लाख हेक्टर क्षेत्रच संरक्षित

राज्यातील सुमारे ६० लाख शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. येत्या ३१ जुलै रोजी यंदाच्या खरीप हंगामाच्या योजनेची मुदत संपत आहे. कृषी विभागाकडून शासन आदेश काढण्यास विलंब व लॉकडाऊनमुळे १.२५ कोटी शेतकऱ्यांपैकी फक्त ६५ लाख ४८ हजार शेतकरीच पीक विमा काढू शकले आहेत.

२०१६-१७ मध्ये राज्यातील १ कोटी २० लाख शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज केला होता. २०१७ -१८ मध्ये हे प्रमाण १ कोटी २ लाख होते. २०१८-१९ मध्ये हे प्रमाण १ कोटी ४७ लाख होते. मात्र, यंदा २७ जुलैपर्यंत हे प्रमाण फक्त ६५ लाख ४८ हजार आहे. ३१ जुलै ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. परिणामी, शासनाने यात मुदतवाढ दिली नाही तर अंदाजे ६० लाख शेतकरी यंदाच्या खरिपात पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यंदा शासन आदेश उशिरा

दरवर्षी २० ते २२ मेच्या सुमारास पीक विम्याचा शासन आदेश येतो. ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना अर्जासाठी ७०-७२ दिवस मिळतात. मात्र, यंदा कृषी विभागाला आदेशासाठी २९ जून उजाडला. शेतकऱ्यांना ३३ दिवसच मिळाले. यंदा शासनाने पीक विम्याचा कालावधी १ वर्षांवरून ३ वर्षे वाढवला. मात्र, जीआरसाठी विलंब व लॉकडाऊनमुळे वाहतूक, सेवा केंद्रांमध्ये आलेले अडथळे यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करण्यात अनंत अडचणी आल्या आहेत.

आतापर्यंत ३३ लाख हेक्टर क्षेत्रच संरक्षित

यंदा फक्त ३३ लाख हेक्टर क्षेत्र विम्याअंतर्गत संरक्षित झाले आहेे. गेल्या तीन वर्षांत ७२ लाख, ५७ लाख, ८८ लाख हेक्टर शेती क्षेत्रास विमा संरक्षण होते.

वर्ष - अर्जदार शेतकरी - संरक्षित क्षेत्र

२०१८-१९ : १ कोटी ४७ लाख : ८८ लाख हेक्टर

२०१७-१८ : १ कोटी २ लाख : ५७ लाख हेक्टर

२०१६-१७ : १ कोटी २० लाख : ७२ लाख हेक्टर

(संदर्भ - कृषी संचालक, महाराष्ट्र शासन )