आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकी प्रवेश:60 टक्के विद्यार्थ्यांचा कल काॅम्प्युटर; आयटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभियांत्रिकीच्या पहिल्या व दुसऱ्या कॅप राउंडचे प्रवेश पूर्ण झाले असून या दोन फेऱ्यांमध्ये ६० टक्के विद्यार्थ्यांनी नव्याने सुरू झालेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅण्ड डेटा सायन्स या शाखेसह काॅम्प्युटर, आयटी या शाखांमध्ये प्रवेश घेण्याला पसंती दर्शविली आहे. कोअर ब्रँच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिव्हिल, मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, इ. अॅण्ड टी. सी. या शाखांमध्ये ४० टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. अभियांत्रिकीसाठी यंदाच्या वर्षी १५ हजार ९६४ जागांसाठी तब्बल २३ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत.

पहिल्या दोन्ही फेऱ्यांमध्येच १०० टक्के विद्यार्थ्यांना अलाॅटमेंट मिळाली असून त्यातील ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर अजूनही अनेक विद्यार्थी बेटरमेंटच्या प्रतीक्षेत असल्याने या विद्यार्थ्यांना आता शेवटच्या तिसऱ्या कॅप राउंडमध्ये प्रवेशाची संधी मिळेल. अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी पहिली व दुसरी फेरीनंतर आता तिसरी फेरी अर्थात कॅप राउंड घेतला जाणार आहे. दुसऱ्या कॅप राउंड अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी गुरुवार (दि. ३) ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पहिल्या कॅप राउंडनंतर २५ ते ३० टक्के विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग करत प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली. तर दुसऱ्या कॅप राउंडनंतर बहुतांश महाविद्यालयांत ५० ते ६० टक्के जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली आहे.

काही विद्यार्थ्यांनी तिसऱ्या कॅप राउंडसाठी बेंटरमेंटचा पर्याय निवडण्याला पसंती दिली आहे. पसंतीचे काॅलेज व आवडीची शाखा निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना आॅप्शन फाॅर्म भरताना तब्बल ३०० पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे. सीईटी परीक्षांच्या निकालानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली. तंत्रशिक्षणच्या पदविका अभ्यासक्रमानंतर इंजिनिअरिंग पदवी (बी. ई, बी. टेक) या अभ्यासक्रमांसाठीही यंदा विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने नोंदणी केली. प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या नाशिकसह विभागात १५ हजार ९६४ जागा उपलब्ध असून त्यासाठी २३ हजार अर्ज दाखल झाले आहेत. या उपलब्ध जागांच्या तुलनेत तब्बल सात हजार विद्यार्थ्यांचे अर्ज जास्त प्राप्त झाले आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. एकूण ३० ते ३५ दिवस ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहील. २१ नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण होईल. एकूण ३ कॅप राऊंड त्यानंतर समुपदेशन फेरी होईल. १ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात आले आहेत.

असा होईल तिसरा कॅप राउंड
४ नोव्हेंबर : तिसऱ्या कॅप राउंडसाठी रिक्त जागांचा तपशील होईल जाहीर
९ नोव्हेंबर : विद्यार्थ्यांना जागा वाटप होईल.
१० ते १२ नोव्हेंबर : विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयांत जाऊन रिपोर्टिंग करून प्रवेश घेण्यासाठी मुदत.
१३ ते २० नोव्हेंबर : रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर जाहीर करणे.
२० नोव्हेंबर : प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत.

बातम्या आणखी आहेत...