आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविवाह नोंदणी कार्यालयात अपुरे मनुष्यबळामुळे व कामाच्या अतिरिक्त ताणामुळे विवाह नाेंदणीची प्रक्रिया संथ गतीने हाेत आहे. याबराेबरच ही नाेंदणी प्रक्रिया किचकट असल्यामुळे विवाह सोहळ्यानंतर विवाह नोंदणीसाठी सरकारी कार्यालयात चकरा मारण्याची वेळ नवविवाहितांवर ओढवत आहे. ही कार्यालये गतिमान व संगणकीकृत करण्यासाठी महापालिकेकडून प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी ही प्रक्रिया कागदावरच राहिल्याने नोंदणीचे प्रमाण ६० टक्क्यांनी घसरले आहे. काेविडच्या आधी २०१९ मध्ये दर महिन्याला पालिकेच्या सहा विभागात एकूण ४५० विवाह नाेंदणी हाेत असे, मात्र सध्या संथ कामकाजामुळे ही नाेंदणी घसरून महिन्याला १८० इतकी हाेत आहे.
महापालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांत विवाह नोंदणी कार्यालये आहेत. येथील कामकाज पेपरलेस पद्धतीने करण्यासाठी संगणकीकरणाची योजना महापालिकेकडून आखली जात आहे. त्यासाठी पाच वर्षांपूर्वी लाखो रुपयांची संगणक खरेदीही करण्यात आली. परंतु, या कार्यालयांच्या संगणकीकरणाला अद्याप मुहूर्तच लागलेला नाही. खरेदी केलेले संगणक, थम्ब मशिन, वेब कॅमेरा असे साहित्य देखिल इतर कामांसाठी वापरण्यात आले आहे.
संगणकीकरणावर भर
लग्नानंतर विवाह नोंदणी करणे आवश्यक असून, त्याची रीतसर कायदेशीर नोंद घेतली जाते. सध्या ही नोंदणी ऑफलाइन पद्धतीने हाेत असून लवकरच ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार.- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक तथा विवाहनोंदणी अधिकारी, महापालिका
विवाह नोंदणीचे हस्तलिखित प्रमाणपत्र
महापालिका प्रशासनाकडून विवाह नोंदणीचे हस्तलिखित प्रमाणपत्र दिले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रमाणपत्रांच्या काेऱ्या प्रती या कार्यालयातील टेबलावर पडलेल्या असतात. या प्रती कोणी नेल्यास त्याचा गैरवापरही होऊ शकतो. यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गांभीर्यांने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
नोंदणी प्रक्रिया किचकट
विवाह नोंदणी करण्याची प्रक्रिया किचकट झाल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. यामुळे अनेकांनी विवाह नाेंदणीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. विवाह नोंदणीचे काम सक्षम अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त्त जबाबदारी म्हणून सोपविलेले असल्याने त्यांच्याकडून नियमित कामानंतर या कामाकडे लक्ष दिले जाते. परिणामी नोंदणी करणाऱ्यांना दिवसभर ताटकळत बसावे लागते. तसेच प्रमाणपत्रास उशीर होतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.