आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर भामट्यांचा निवृत्त अधिकाऱ्याला गंडा:फसवी लिंक पाठवून लंपास केले 7 लाख! सायबर पोलिसांमुळे मिळाली लाखमोलाची रक्कम

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सायबर हॅकरचा फसवणुकीचा नवीन फंडा समोर आला आहे. महावितरणमधून बोलत असल्याचे सांगत तुमचे लाईट बिल थकले, ते तत्काळ न भरल्यास लाईट तासभरात कट होईल असे सांगत ऑनलाईन गंडविले जात आहे. असाच एक प्रकार बीएसएनएलमधून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यासोबत घडला. पण ,सायबर भामट्यांनी त्यांची सात लाखांची हडपलेली रक्कम सायबर पोलिसांमुळेच त्यांना परत मिळाली.

अमृतकर यांना भामट्यांनी फसवी लिंक पाठवून त्यावर त्यांना क्लिक करायला भाग पाडून रक्कम हडपत फसवणूक केली होती.

याबाबत उपआयुक्त संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. रामदास शिवराम अमृतकर (वय 73, रा. साईनाथ नगर वडळा शिवार) हे बीएसएनएलमधून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या मोबाईलवर मेजेस आला. विज बिल न भरल्याने विज पुरवठा खंडीत करण्यात येईल असा इशारा मेसेजमध्ये होता. तसेच हॅकरने तुम्ही भरलेले बिल पेंडीग असल्याचे दिसत आहे असे सांगत क्विक सपोर्ट लिंक पाठवली.

अमृतकर यांनी पाठवलेली लिंक फसवी होती पण त्यावर त्यांनी क्लिक करताच त्यांच्या फोनचा ताबा सायबर हॅकरला मिळाला. अमृतकर यांनी फिक्स डिपाॅजिट केलेले 7 लाख रुपये भामट्यांनी इंटरनेट बँकिंगद्वारे लंपास केले.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी दोन तासांत सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ निरिक्षक सुरज बिजली, उपनिरिक्षक दानिश मन्सुरी, अनिल राठोड, यांच्या पथकाने उपआयुक्त संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

अशी केली फसवणूक

28 मे रोजी अमृतकर यांनी लिंक वर क्लिक केल्यानंतर हॅकरने त्यांच्या मोबाईलचा ताबा घेतला होता. अमृतकर यांच्या मोबाईलमध्ये रिमोट अॅक्सीस अॅप असल्याने पैसे कुठे गेले याची माहिती मिळते. मात्र हॅकर बँकेकडून येणारे मेसेज डिलिट करत असल्याने त्यामुळे रक्कम कुठे वर्ग झाली याची माहिती मिळण्यात अडचण येत होती. सायबर पोलिसांनी बँक खात्याचे बारकाईने निरिक्षण केले. रक्कम क्रेडीट कार्डचे बिल भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाॅलेट मध्ये वर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. आयसीआयसीआय बँकेचे दोन क्रिडीट कार्डचे बिल भरल्याचे समोर आले.

पोलिसांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे माहिती दिल्याने सर्व व्यावहार होल्ड करण्यात येऊन 4 जूनला अपहार झालेली रक्कम पुन्हा अमृतकर यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली.

सायबर पोलिसांमुळे माझी जमापुंजी मिळाली

फसवणूक झाल्याने पैसे परत मिळतील याची शाश्वती नव्हती. सायबर पोलिसांनी केवळ तक्रार अर्जावर तपास करत माझी आयुष्याची जमापुंजी मला परत मिळवून दिली.पोलिस दलाचे मी मनापासून अभार व्यक्त करतो. -रामदास अमृतकर, तक्रारदार

बातम्या आणखी आहेत...