आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीच्या तोंडावर:नाशिक महापालिकेत 700 पदांच्या नोकर भरतीचा मार्ग मोकळा; सेवा प्रवेश नियमावलीला मिळणार मंजुरी

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तब्बल 700 पदांसाठीच्या नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. सेवा प्रवेश नियमाला मंजुरी मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे ही भरती होण्याची शक्यता आहे.

एकीकडे झपाट्याने वाढणारे शहर व त्यादृष्टीने पालक संस्था म्हणून मुलभूत सुविधा पुरवण्यात पालिकेला अपुऱ्या मनुष्यबळामुळे येत असलेल्या अडचणीतून अखेर मुक्तता हाेणार असून, २०१७ पासून राज्याच्या नगरविकास विभागाकडे पडून असलेली सेवा प्रवेश नियमावली व बिंदू नामावलीची फाइल अखेर सापडली आहे. त्यामुळे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत पुढील आठ दिवसांत त्यास मान्यता मिळण्याची शक्यता असून, तसे झाले तर नाेकरभरतीचा बिगुल वाजणार आहे. आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्या दिवसापासून रमेश पवार यांनी नाेकरभरतीसाठी धडपड सुरू केली. त्याची दखल घेत नगरविकास मंत्र्यांचे ओसडी बालाजी खतगावकर यांनी युद्धपातळीवर हालचाली करून फाइल मिळवल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

आकृतीबंधास मान्यता नाही

नाशिक महापालिकेची ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्गात पदाेन्नती झाली असून ‘ब’ वर्गानुसार महापालिकेने १४ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला हाेता. मात्र, या आकृतीबंधास अद्यापही मान्यता मिळालेली नाही. प्रामुख्याने पालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यापेक्षा अधिक असल्यामुळे नाेकरभरतीवर निर्बंध आहेत. दुसरीकडे, या निर्बंधामुळे नवीन कर्मचारी मिळत नाहीत. त्यात आहेत ते अधिकारी व कर्मचारी निवृत्त हाेत असल्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न गहन झाला आहे.

मनुष्यबळ प्रश्न गहन

महापालिकेत ‘क’ वर्ग संवर्गातील मंजूर पदांची संख्या ७०८२ असून सध्या साडे चार हजार कर्मचारी कार्यरत अाहेत. त्यामुळे अडीच हजार पदे भरणे गरजेचे हाेते. अास्थापना खर्चामुळे रिक्त पदे भरता येत नसल्याचे बघून किमान अत्यावश्यक सेवा असलेल्या आरोग्य-वैद्यकीय, अग्निशामक, तांत्रीक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती व्हावी यासाठी अायुक्त पवार यांचा पाठपुरावा सुरू हाेता. पवार यांनी गेल्या महिनाभरापासून या फाईलसाठी पाठपुरावा केल्यानंतर नगरविकास खात्याने जुनी फाईल सापडून त्यावरील धुळ झटकली आहे.

कोणत्या पदांची भरती?

मध्यंतरी राज्य शासनाने विविध संवर्गांतील, तसेच नवनिर्मित अशा ८७५ नवीन पदांना मंजुरी दिली. मात्र, अस्थापना खर्चामुळे ती होऊ शकली नाही. आता अस्थापना खर्चाची अट वगळून भरतीच्या परवानगीसाठी पालिकेने पाठपुरावा केल्यानंतर पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवेतील ३४८ पदांबाबत आस्थापना खर्चाची अट शिथिल केली हाेती. त्यानुसार अग्निशमन विभाग, वैद्यकीय विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम, नगररचना विभागातील आवश्यक अशा ५२७ माहिती मागवली होती. ही माहिती पाठवल्यानंतर केवळ सेवा प्रवेश नियमावली मंजूर करण्यास परवानगी मिळालीय. त्यामुळे भरतीतला खोळंबा दूर झाला आहे. आता पहिल्या टप्प्यात अग्निशमन, वैद्यकीय व इंजिनिअरची भरती हाेणार असल्याची माहिती आयुक्त पवार यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...