आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्स्पोज:काेराेना मृतांच्या 71 कुटुंबियांना सानुग्रह अनुदानाचा दोनदा लाभ; इतरांनी रक्कम परत न केल्यास फाैजदारी

किशाेर वाघ| नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे मृत झालेल्या जिल्ह्यातील ७१ कुटुंबियांनी खोटे बोलून, चुकीची माहिती देऊन तसेच शासकीय यंत्रणेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे तब्बल दोनवेेळा सानुग्रह अनुदान मिळवले आहे. विशेष म्हणजे यातील काहींना चुकून दोनवेळा लाभ मिळाला तर अनेक कुटुंबियांनी जाणीवपूर्वक नावाच्या स्पेलिंगमध्ये थाेडा बदल करून हे लाभ मिळविले आहे. प्रशासनाने आता या रकमेच्या वसुलीची मोहीम सुरू केली असून, नऊ जणांनी प्रत्येकी ५० हजार रुपये परत केले आहे. इतर ६२ कुटुंबियांनी त्वरित पैसे परत न केल्यास संबंधितांवर थेट फाैजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबे उद‌्ध्वस्त झाली आहे. अनेक मुले अनाथ झालीत. घरातील कर्ता पुरुष गेल्याने रस्त्यावर आलेल्या या कुटुंबांना न्यायालयाच्या आदेशाने सहानुभूती म्हणून ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जात आहे. पण, हे अनुदान घेतानाही अनेकांनी त्वरित आपली नीतिमत्ता गहाण ठेवून घरातील एकाच व्यक्तीच्या नावाने दोनवेळा ५० हजार रुपयांचे अनुदान घेतल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक जिल्ह्यातील ७१ कुटुंबियांनी असा दुहेरी लाभ घेतला असून, यातील नऊ कुटुंबियांनी ते समजताच रक्कम परतही केली आहे. परंतु, ६२ कुटुंबियांना दोनवेळा जिल्हा प्रशासन, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने संपर्क करण्यात आला असताना अद्यापही त्यांनी पैसे परत केले नाही.

..तर थेट फाैजदारी गुन्हा दाखल करणार
कोरोनात रुग्णालयांत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या बाबतीत विशेष अडचण नाही. परंतु, घरी किंवा रुग्णालयात घेऊन जाताना मृत्यू झालेल्या व्यक्तींच्याच वारसांना लाभ देताना काही अडचणी आल्या. आता ते नियमित तपासून घेतले जात असून, ६२ कुटुंबियांकडून अनुदान रकमेची वसुली सुरू आहे. आतापर्यंत निदर्शनास आलेल्या ७१ पैकी ९ जणांनी रक्कम परत केली आहे. ६२ जणांना नोटिसा पाठवत आहोत. पैसे परत न केल्यास थेट फाैजदारी कारवाई करू.- श्रीकृष्णा देशपांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

दोनदा अनुदान वितरणाची संभाव्य कारणे अशी
अर्जदारांकडून अर्धवट तसेच चुकीची माहिती भरण्यात आल्याने आधारबेस पेमेंट करण्यात आले. बँक माहिती अद्ययावत केल्यानंतर पुन्हा संबंधित खात्यात एनइएफटी करण्यात आली आहे.
खात्याचे स्टेटमेंट न बघताच नागरिकांनीही पैसे आले नसल्याचे खोटे सांगत पुन्हा अनुदान पदरात पाडून घेतले.
एकाच कुटुंबातील दोन भिन्न व्यक्तींकडून अनुदानासाठी अर्ज प्राप्ती.
मृतांच्या नावात स्पेलिंगमध्ये काहीसा बदल करूनही घेतला आहे दुहेरी लाभ.

बातम्या आणखी आहेत...