आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक ‘खड्डा:रस्त्यांवरील 725 काेटी वाया; खड्डे जैसे थे, पालिकेच्या सर्वेक्षणातच उघड

नाशिक / भूषण महालेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या पावसाळ्यात गेल्या पाच वर्षांत बाराशे काेटी खर्चून तयार केलेले रस्ते उखडले आहेत. त्याबराेबरच पाच वर्षांपुढील व देखभाल दुरुस्ती कालावधी संपलेले जवळपास ७२५ काेटींचे रस्तेही खड्ड्यात गेले आहेत. त्यामुळे आता पुन्हा या रस्त्याच्या कामासाठी तेवढेच म्हणजेच ७२५ काेटी किंबहुना त्यापेक्षा अधिक रक्कम लागू शकते. विशेष म्हणजे ही बाब महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या सर्वेक्षणातच उघड झाली आहे. पालिकेच्या तिजाेरीत खडखडाट असल्यामुळे किंबहुना दुरुस्तीसाठी वर्षाच्या सुरुवातीला तरतूद केलेल्या जवळपास ४० काेटींचा निधीही खड्डे भरण्यातच गेल्यामुळे आता या निधीसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून गेल्या पाच वर्षांत शहरातील रस्त्यांवर जवळपास बाराशे कोटींचा खर्च केला आहे.

गेल्या दाेन वर्षांत जवळपास सहाशे काेटींचे रस्ते झाले आहे. मात्र यंदाच्या पावसात जुने तर साेडा नवीन रस्तेही उखडले आहेत. अतिपावसामुळे रस्ते उखडल्याचा दावा केला जात आहे. खड्ड्यामुळे रस्त्याचा दर्जा व गुणवत्ता याबाबतही गंभीर आराेप झाले. काही नगरसेवक व ठेकेदारांनी केलेल्या कथित भागीदारीमुळे तसेच पालिकेतील अवास्तव टक्केवारीच्या गणितामुळे रस्ते दर्जाहीन झाल्याचे आराेप झाले. ही बाब लक्षात घेत आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दोष निवारण कालावधी (डिफेक्ट लायबिलिटी)तील रस्ते दुरुस्त करण्याबराेबरच १३ ठेकेदारांना नाेटीसही काढण्याचे आदेश दिले हाेते. दरम्यान, नवीन रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता ही त्रयस्थ संस्थेकडून तपासण्याचाही निर्णय घेतला. दरम्यान, पावसाळा संपल्यानंतर आयुक्तांनी बांधकाम विभागाकडून शहरातील पाच वर्षांपेक्षा जुन्या व ज्यांच्या देखभाल दुरुस्तीचा कालावधी संपला अशा रस्त्यांची अवस्था काय याचा अहवाल मागवला हाेता. त्यानुसार बांधकाम विभागाच्या सहाही विभागातील कार्यकारी अभियंत्यांनी जवळपास ७२५ काेटी रुपयांची रस्ते अस्तरीकरण तसेच दुरुस्तीसाठी आवश्यकता असल्याचा अहवाल दिला आहे.

खड्ड्यांचे गणित काही उलगडेना सप्टेंबर महिन्यात नऊ हजार खड्डे बुझवल्याचा दावा पालिकेने केला हाेता. त्यानंतर पावसाळा संपल्यानंतर खड्डे दुरुस्तीचे काम वेगाने हाती घेतले गेले. मात्र गेल्या चार महिन्यांत किती खड्डे भरले गेले, त्यापाेटी किती खर्च आला याची माहिती मात्र उपलब्ध हाेत नसल्यामुळे संशय वाढला आहे.

राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवणार रस्ते दुरुस्ती व अस्तरीकरणासाठी ६ विभागात ७२५ काेटींचा निधी लागणार असून राज्य शासनाकडे नाशिकसाठी पॅकेज मिळवण्याचा प्रयत्न आहे. - डाॅ चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त

बातम्या आणखी आहेत...