आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तस्करी:कत्तलीसाठी नेत असलेल्या 85 उंटांची नाशकात सुटका, राजस्थानमधून हैदराबादकडे नेण्यात येत होते उंट

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानहून हैदराबादेत कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या ८५ उंटांची गुरुवारी नाशकात सुटका करण्यात अाली. अॅनिमल वेल्फेअरच्या पथकाने या उंटांची सुटका करून सर्व ८५ उंटांना चुंचाळे येथील पांजरपोळ येथे सोडण्यात अाले. विशेष म्हणजे धुळे ग्रामीण व शहर पोलिसांनी एवढ्या संख्येने उंट पायी नेण्यात येत असताना साधी चौकशीदेखील करण्यात अाली नसल्याची माहिती अॅनिमल वेल्फेअरच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

अॅनिमल वेल्फेअरचे पुरुषोत्तम अाव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान येथून तब्बल ८७ उंट हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती दिल्यानंतरही पोलिसांनी उंट वाहतूक करणाऱ्यांची चौकशीही केली नाही. उंट शहर पोलिस अायुक्तालयाच्या अाडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन येथे अाल्यानंतर अाव्हाड यांनी पोलिसांना कळवले. मात्र, पोलिसांनी तपोवनात एवढ्या संख्येने उंट राहिल्यास परिसरात अस्वच्छता निर्माण होईल याचे कारण देत उंटांना तपोवनातून पुढे काढून दिले. भद्रकाली पोलिसांनीही कारवाई केली नाही. अाव्हाड यांनी पशुवैद्यकीय पथकासह सर्व उंटांची तपासणी केली असता २ उंटांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान केले.

रॅकेटमागे मोठे व्यापारी असल्याचा संशय
उंट हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेण्यात येत होते. या रॅकेटमागे मोठे व्यापारी असल्याचा संशय अाहे. वाहतूक करणाऱ्यांनी उंट हैदराबाद येथे सोडण्यासाठी पैसे मिळाल्याचे सांगितले. यामुळे संशय बळावला. उंटांची संख्या अधिक असल्याने पांजरपोळ संस्थानाला कळवले. त्यांनी तत्काळ होकार देत उंटांना पांजरपोळ येथे ठेवण्याची तयारी दर्शवली. - पुरुषोत्तम अाव्हाड, अॅनिमल वेल्फेअर अाॅफिसर