आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबसमध्ये खचाखच भरलेले प्रवासी.... कुणाला नाेकरीनिमित्त तर कुणाला लग्नसाेहळ्याला जाण्याची प्रतीक्षा... दुसरीकडे मात्र त्याच बसमध्ये एका काेपऱ्यात अनेक महिन्यांपासून धूळखात पडलेले फायर एक्सटिंग्युशर...तर बसच्या स्टेअरिंगजवळ पसरलेला वायरिंगचा गुच्छ,़ तुटलेले हेडलाइट अन् खिळखिळी बस ही जणू काही अपघाताला आमंत्रण देणारी. ही परिस्थिती आहे शहरातील नवीन बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या बसेसची.
शिंदे-पळसेला एस.टी. महामंडळाच्या बसचे ब्रेक फेल झाल्याने झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीवरील दाेघांचा आगीत हाेरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर एस.टी. महामंडळाच्या बसेसच्या दुरवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले हाेते. याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या नवीन स्थानकातील बसेसच्या ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने आढावा घेतला.
या पाहणीत स्थानकातील अनेक बसेस खिळखिळ्या झाल्याचे दिसले. राेज प्रवास करणाऱ्यांच्या जीवाशी जणू एसटी महामंडळ एकप्रकारे खेळच करत आहे. काही बसेसच्या हेडलाइट तुटलेल्या, पत्रे वाकले हाेते. महत्त्वपूर्ण स्टेअरिंगच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची बाब समाेर आली आहे. स्टेअरिंगच्या ठिकाणी वायरिंग निघाल्याने शाॅर्टसर्किट हाेण्याचा धाेका असून अशी स्थिती असतानाही सुरक्षितता धाब्यावर बसवत प्रवाशांची वाहतूक केली जात आहे.
तक्रारींकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
बसच्या दुरवस्थेमुळे तांत्रिक बिघाड निर्माण हाेताे. परिणामी अपघाताची शक्यता असल्याने कर्मचाऱ्यांकडून दुुरुस्तीबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, केवळ उत्पन्नवाढीवर लक्ष देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
अधिकाऱ्यांना कधी येणार जाग
विभागात ९ महिन्यांत ११९ अपघात झाले आहे. यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. मात्र तरीही बसच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जात आहे. आणखी किती अपघात झाल्यानंतर एस.टी.च्या अधिकाऱ्यांना जाग येणार? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
‘त्या’ बसेसची तातडीने दुरुस्ती
^प्रवाशांच्या सुरक्षिततेला एसटी महामंडळाकडून प्राधान्याने लक्ष दिले जाते. ज्या बसेसबाबत त्रुटी आढळून येतील त्यांची तातडीने दुरुस्ती केली जाईल.- अरुण सिया, विभागीय नियंत्रक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.