आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेच्या दुर्लक्षामुळे पात्रात अतिक्रमणे:3 तासांत एका महिन्याचा पाऊस

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सरस्वती नदीच्या उगमस्थान असलेल्या ढग्या डोंगराच्या परिसरासह शहरात गुरुवारी (दि. १) रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नदीला आलेल्या महापुराचा सिन्नर शहराला माेठा फटका बसला तर काठावरील शंभरावर कुटुंबे बेघर झाली. नदीपात्रात झालेल्या अतिक्रमणांमुळे पात्र अरुंद झाल्याने १९६९ नंतर २०२२ मध्ये पहिल्यांदाच इतकी भयानक महापुराची परिस्थिती उद्भवल्याचे जाणकारांनी सांगितले. सिन्नरची सप्टेंबरमधील पावसाची सरासरी १२३ मिलिमीटर असून गुरुवारी सायंकाळी ६ ते ९ या तीन तासांतच १६५ मिमी पावसाची नाेंद झाली आहे.

नाशिक वेस, गणेश पेठ, नेहरू चौक, भैरवनाथ मंदिराच्या समोरील व नाशिक वेशीमधील बाजारपेठेतील गाळ्यांमध्ये सुमारे तीन ते चार फूट पाणी घुसल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. अनेक दुचाकी, चारचाकी वाहने वाहून गेली. त्याचबरोबर तीन ते चार तरुण बेपत्ता असून ते महापुरात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पावसाने ढग्या डोंगराच्या परिसरात असलेल्या बंधाऱ्याचा भराव खचण्याची शक्यता निर्माण झाल्याने माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखून सांडवा फोडून दिला. साहजिकच बंधाऱ्यातून पाण्याचा माेठा प्रवाह सुरू झाला. त्यामुळे आयटीआयच्या पाठीमागील बंधाऱ्यात एकाच वेळी पाण्याचा मोठा लोट आल्याने सांडव्यासोबतच पूर्वेकडच्या भागातून भरावावरून पाणी पडल्याने सरस्वतीच्या पात्रात पाण्याची वाढ झाली. परिणामी अरुंद झालेल्या पात्रातून हे पाणी जागा मिळेल तिकडे धावू लागले. देवी मंदिर परिसरात ऐश्वर्या गार्डनपर्यंत तीन ते चार फूट पाणी आल्याने तेथील नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले. महसूल, पालिका, पोलिस प्रशासन आणि स्थानिकांच्या मदतीने अडकलेल्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. पाणी थेट नेहरू चौकातील मुत्रक संकुलापर्यंत पोहोचले. त्यामुळे परिसरातील सर्व व्यावसायिक गाळ्यांमध्ये अडकले. त्यांनाही दोर बांधून प्रशासनाच्या मदतीने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. या पुरामुळे देवी मंदिरापासून संगमनेर-नाक्यापर्यंत नदीपात्रात असलेल्या १०० हून अधिक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली.

बेपत्ता असलेल्या दाेघांपैकी एकाचा मृतदेह सापडला
सोनालाल दशरथ महंत (३५, रा. गोजरे मळा) हे बेपत्ता असल्याची तक्रार सिन्नर पोलिसांत करण्यात आली हाेती, मात्र सायंकाळी दातली शिवारातील देवनदी पात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. याशिवाय अपना गॅरेजजवळील मुन्ना पठाण (२२) हा तरुणही गुरुवारी चार वाजेपासून गायब असल्याचे त्याच्या आईने माध्यमांना सांगितले. त्यामुळे त्याचाही शाेध सुरू आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीचे आवाहन
निसर्गाच्या रौद्र रूपाने सिन्नर शहरावर गुरुवारी पुराचे संकट ओढवले. सरस्वती नदीलगत असणाऱ्या सर्व नागरिक, व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते व फेरीवाले यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे व सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले आहे. शहरातील मातोश्री नर्मदा लॉन्स येथे मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे.

..तर २०० दलघफू क्षमतेचा तलाव भरला असता
१६५ मिलिमीटर पाऊस पडल्याने सुमारे ५ हजार क्यूसेकपेक्षा अधिक पाणी सरस्वती नदीतून वाहत होते. नदीची क्षमता केवळ ४०० ते ५०० क्यूसेक इतकीच उरली असून १० पट अधिक क्षमतेने पाणी वाहत होते. ६ तासांहून अधिक काळ वाहिलेल्या एवढ्या पाण्यातून २०० दलघफूचा पाझर तलाव सहजगत्या भरला असता. - अविनाश लोखंडे, सेवानिवृत्त जलसंधारण अधिकारी

बातम्या आणखी आहेत...