आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमांची पायमल्ली:सटाणा, सायखेड्यानंतर घोटीतही उघड्या जीपमधून पोलिस अधिकाऱ्याची मिरवणूक

घोटी25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाकाळात पोलिस अधिकाऱ्यांच्या स्वयंगौरव यात्रेची हॅट‌्ट्रिक

कोरोनाची तिसरी लाट अजून गेली नाही. केवळ निर्बंध शिथिल केले असून नियमांचे काटेकोर पालन करण्याचे बंधन आहेच. परंतु, पोलिस अधिकाऱ्यांनीच नियम धाब्यावर बसवून स्वत:च्याच निरोप समारंभाच्या मिरवणुका काढायचा सपाटा लावला आहे. जिल्ह्यात सटाणा, सायखेड्यापाठोपाठ आता घोटीतही पोलिस अधिकाऱ्याच्या निरोपासाठी वाजतगाजत, अंगावर फुले उधळत ऐटीत मिरवणूक निघाली. जनतेला नियम दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांकडूनच स्वयंगौरवाच्या मिरवणुकांचे पेव जिल्ह्यात फुटले असून त्यांना आता कायदा दाखवून कोण आवरणार, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

घोटी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक जालिंदर पळे यांची जळगाव ग्रामीणला बदली झाल्याने त्यांना निरोप देण्याचा सोहळा शनिवारी पार पडला. दोन वर्षांच्या कार्यकाळात म्हणे त्यांनी सगळे काही समन्वयातून सोडवले, कायदा चांगला हाताळला म्हणून पोलिस ठाण्याच्या गेल्या २०-२५ वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच येथे एखाद्या अधिकाऱ्याची अशी मिरवणूक काढण्यात आली. सगळ्यांच्या या लाडक्या अधिकाऱ्याच्या कार्यक्रमाला मग आजी-माजी आमदार, राजकीय पदाधिकारी झाडून उपस्थित राहिले. अनेक संस्था, संघटनाही हारतुरे घेऊन आल्या. प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा अधिकारी असल्याने कार्यक्रमाला गर्दीही तोबा जमली. अधिकारी पळेही प्रेमाने भरून पावले. उघड्या जीपमध्ये मिरवणूक काढल्यानंतर आधीच्या दोन मिरवणुकांप्रमाणे मग पळेंवरही पुष्पवृष्टी करण्यात येत होती. आता स्वयंगौरवाचा हा सिलसिला कुणी थांबवणार की आणखी अशा मिरवणुका फेस येईपर्यंत निघणार असे सवाल उपस्थित होत आहेत.

पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना ‘दिव्य मराठी’चे प्रश्न
सटाणा, सायखेडा आणि घोटीतील पोलिस अधिकाऱ्यांची प्रचलित नियमानुसार बदली झाली. मात्र, या अधिकाऱ्यांची कोरोना नियमांचे उल्लंघन करत चक्क मिरवणूक काढण्यात आली, यावर काय कारवाई करणार?

अधीक्षक पाटील- सटाणा, सायखेडा पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित नागरिकांवर कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याने १८८ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

कोरोनाचे निर्बंध लागू असताना पोलिसांकडूनच उल्लंघन होत आहे.
अधीक्षक पाटील- ही नक्कीच गंभीर बाब आहे. कायद्याचे ज्ञान असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांकडून कोरोनाकाळात मिरवणूक काढली जात असल्याची गंभीर दखल घेतली आहे. उपअधीक्षकांना चौकशीच्या सूचना दिल्या आहेत.

नेमकी कारवाई काय होणार?
अधीक्षक पाटील- बदली झालेल्या काही अधिकाऱ्यांना अद्याप बदलीच्या ठिकाणी सोडले नाही. दिव्य मराठीच्या वृत्ताची दखल घेत पोलिस उपअधीक्षकांच्या चौकशी अहवालानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...