आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएबीबी सर्कल ते जेहान सिग्नलदरम्यान दाेन किलाेमीटरचा रस्ता व्हीव्हीआयपी, व्हीआयपी माेमेंटाेसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जाताे. याच मार्गाने राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह मंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ताफा बऱ्याचवेळा जाताे. त्यामुळे हा मार्ग अतिशय सुरक्षित असा मानला जाताे. मात्र, शुक्रवारी मध्यरात्री या मार्गावरील पारिजातनगर सिग्नलवर दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात कार डिव्हायडरला धडकून अपघात झाला.
या प्रकारानंतर डी.बी. स्टारने या महत्त्वाच्या रस्त्याचे स्कॅनिंग केले असता या दाेन किलाेमीटरच्या मार्गातच डिव्हायडरला तब्बल ३१ ठिकाणी जंक्चर असल्याचे दिसून आले. त्यामुळे व्हीआयपी मार्ग म्हणून आेळख असणारा रस्ताच कसा धाेकेदायक आहे यावर डीबी स्टारने टाकलेला प्रकाशझाेत..
रस्त्यांवर मोठे जंक्शन असल्याशिवाय दुभाजकाला जंक्चर नसावेत, असा स्पष्ट नियम आहे. मात्र, व्हीआयपी मार्ग म्हणून आेळखल्या जाणाऱ्या एबीबी सिग्नल ते जेहान सिग्नल दरम्यानच्या रस्त्यावरील दुभाजक तोडून मार्ग मोकळा करण्याचा ‘उद्योग’ नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. वळसा घालून येण्यापेक्षा दुभाजकातील जंक्चरचा शॉर्टकट म्हणून वाहनचालकांकडून वापर केला जात असल्याने या मार्गावर अपघात वाढू लागले आहेत. या मार्गावरून नेहमीच व्हीआयपींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ताफा जाताे. त्यामुळे हा मार्ग अधिक सुरक्षित असणे गरजेचे असताना त्याकडे यंत्रणेकडून सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून आले. या मार्गावर बहुतांश ठिकाणी ‘दुभाजक तोडा, दुकाने जोडा’ असेच धोरण स्वीकारलेले असल्याचे पाहणीत दिसून आले. वाहतूक सुरळीत व्हावी, अपघात टळावेत या उद्देशासाठी रस्त्यांवर दुभाजक टाकले जातात. माेठ्या चाैकात अथवा सिग्नलवर यू-टर्नसाठी व्यवस्था केली जाते.
मात्र, महात्मानगर भागात अनेक हॉटेल्स व दुकानांसमोरील दुभाजकात जंक्चर ठेवण्यात आल्याने येथून वाहनचालकांकडून धाेकेदायकपणे रस्ता आेलांडला जात असल्याने अपघात वाढले आहेत. विशेष म्हणजे, या भागात सात ठिकाणी अधिकृतरित्या ४० ते ६० मीटर अंतरावर ‘यू-टर्न’ तसेच एका बाजूतून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी जागा आहे. असे असतानाही जंक्चरचा अट्टहास नेमका कशासाठी याकडे वाहतूक शाखा आणि महापालिकेने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
व्हीआयपींची निवासस्थाने
एबीबी सर्कल ते जेहान सिग्नल मार्गावर पोलिस आयुक्तांसह महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह व्हीआयपींची निवासस्थाने आहेत. त्यामुळे या मार्गावरून त्यांचा नेहमीच वावर असताे. तरीही त्यांचे या अनधिकृत व धोकादायक जंक्चरकडे लक्ष जात नसल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जंक्चरमुळे वाढले अपघात
या रस्त्यावर तब्बल ३१ छोटे-मोठे जंक्चर आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालवताना चालकांची कसरत हाेते. चौक किंवा वळण लक्षात येत असल्याने वाहन हळू केले जाते. मात्र, अनधिकृत जंक्चरमधून अचानक वाहन आल्यास ते लक्षात येत नसल्याने चालकांचा ताबा सुटून अपघात हाेत आहेत. शुक्रवारी मध्यरात्री झालेला अपघातही अशाचप्रकारे झाला आहे.
पोलिस आयुक्तांच्या घराजवळ बॅरिकेड्स
महात्मानगर भागात असलेल्या पोलिस आयुक्तांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या मार्गावरील डिव्हायडरवरील जंक्चरवर बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहे. मात्र, तिथे पाच फुटांच्या अंतरावरच दुभाजक तोडून आणखी एक नवीन जंक्चर तयार करण्यात आलेले असून ते अतिशय धोकादायक असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.
तुटलेल्या दुभाजकाच्या अवशेषामुळे अपघात
महात्मानगर भागातील या रस्त्यावरील दुभाजक अनेक ठिकाणी तुटले आहे. त्यामुळे त्याचे अवशेष रस्त्यांवर आले आहेत. बऱ्याच वाहनचालकांना हे अवशेष लक्षात येत नसल्याने परिणामी दुभाजकाच्या अवशेषांवर आदळून वाहनांचे अपघात घडण्याचेही प्रकार वाढले आहेत.
महापालिका, वाहतूक शाखेचे दुर्लक्ष
महात्मानगर रस्त्यावरील बहुतांश दुभाजक हे शोरूम, हॉस्पिटल, दुकाने व हॉटेल्ससमोर तोडून गॅप निर्माण करण्यात आले आहेत. यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. महापालिकेसह वाहतूक शाखाने यावर कारवाई करणे गरजेचे आहे.- अंकुश राऊत, नागरिक
अपघातात वाढ...
रस्त्यावरून सरळ दुचाकी चालवत असताना अचानक दुभाजकाच्या गॅपमधून एखादे वाहन आल्यास तारांबळ उडते. बेशिस्त वाहनधारकांमुळे अपघातांच्या घटना घडतात. यावर पोलिसांकडून कारवाई अपेक्षित आहे. - सागर बेदरकर, वाहनचालक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.