आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआधीच १८ काेटींवरून ४६ काेटींवर गेल्यामुळे पेस्ट कंट्राेलचा ठेका वादात असताना आता पुढील तीन वर्षांसाठी निविदा प्रक्रिया अंतिम हाेऊन ठेकेदार निश्चित झाला असतानाही त्यांना काम देण्याचे साेडून जुन्याच ठेकेदाराला साडेतीन वर्षे मुदतवाढीद्वारे काम देण्याचा नवा विक्रम पालिकेने केला आहे. केद्रांच्या सिव्हीसी गाइडलाइनचे उल्लंघन हाेत असल्याचे समाेर आले असून नवीन निविदा अंतिम करण्याचे साेडून जुन्या ठेकेदाराला मुदतवाढ देण्याचे कारण काय असाही प्रश्न केला जात आहे. शहरात कीटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव हाेऊ नये यासाठी धूर व औषध फवारणीसाठी दिला जाणारा पेस्ट कंट्रोलचा ठेका गेल्या साडेतीन वर्षांपासून वादात आहे.
मे. दिग्विजय एंटरप्रायजेस या ठेकेदाराची मुदत ७ ऑगस्ट २०१९ मध्येच संपुष्टात आल्यानंतर जवळपास साडेतीन वर्षांपासून त्यास मुदतवाढ दिली जातआहे. मुख्य म्हणजे, या कामासाठी २०१९ मध्येच प्रक्रिया झाल्यानंतर १८ कोटींचा ठेका ४६ कोटींवर गेल्यामुळे वाद निर्माण झाला. तत्कालिन आयुक्त कैलास जाधव यांनी ही निविदा प्रक्रियाच रद्द करत फेरनिविदा काढल्यानंतर त्याविराेधात दिग्विजय एंटरप्रायझेसने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात युक्तिवाद करून पालिकेच्या बाजूने निर्णय लावण्याचे साेडून एका अधिकाऱ्याने कथितरित्या ठेकेदाराशी संगनमत केल्यामुळे स्थगित कायम राहिली. परिणामी, जुन्या ठेकेदाराकडे मुदतवाढीच्या हत्याराने ठेक्याचे कामकाज सुरूच राहीले.
त्यानंतर तत्कालिन आयुक्त रमेश पवार यांनी पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यात अनावश्यक खर्चात कपात करून हा ठेका ४६ कोटींवरून ३३ कोटी रुपयांवर आणत सुधारित विभागवार निविदा काढली. ही निविदा अंतिम झाली असून सहा विभागासाठी आवश्यक पात्र ठेकेदार आले असतांनाही त्यांना काम देण्याचे साेडून वादग्रस्त ठेकेदारासाठी पायघड्या घातल्या जात असल्याचे वृत्त आहे. नवीन ठेक्याची प्रक्रिया हाेत नसल्यामुळे जुन्या ठेकेदारास पेस्ट कंट्राेलचे काम दिले गेले असून ७ ऑगस्ट २०१९ ते आतापर्यंत जवळपास कालावधी लक्षात घेतला तर साडे तीन वर्षाचा कार्यकाळ झाला आहे. एकप्रकारे मुदतवाढीचा विक्रम मानला जात आहे.
आयुक्तच घेतील फेरनिविदेचा निर्णय
पेस्ट कंट्रोलची निविदा प्रक्रियेची फाइल आयुक्तांकडे पाठवली आहे. फेरनिविदेचा निर्णय माझ्या अधिकार कक्षेत नसून हा निर्णय आयुक्त घेतील. - डॉ. राजेंद्र त्र्यंबके, मलेरिया विभाग प्रमुख, मनपा
प्रशासकांवर दबाव नेमका कसला ?
ठेक्याची निविदा पूर्ण झाल्यानंतर ३ विभागांसाठी २ तर उर्वरित ३ विभागांसाठी ३ ठेकेदार पात्र ठरले . मात्र दाेनच ठेकेदारांना संपूर्ण काम मिळावे यासाठी प्रशासकांवर दबाव असल्याचे समजते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.