आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ:डिप्लोमा फार्मसीचे प्रवेश; 7 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औषधनिर्माणशास्त्र विभागाच्या पदवी व पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अजूनही रखडलेलीच आहे. तर दुसरीकडे तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे प्रवेश अर्जासाठी वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. डी. फार्मसी या पदविका अभ्यासक्रमाच्या अर्जासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून सोमवार दि. ७ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल.

दरम्यान, मुदतवाढीमुळे पुढील प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडले आहे. बारावीनंतर औषधनिर्माणशास्त्र शाखेतील पदविका अभ्यासक्रम असलेल्या डी. फार्मसीला प्रवेश दिला जातो. एकीकडे दहावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली असून वर्गही सुरू झाले आहेत. तर दुसरीकडे डी. फार्मसीची प्रक्रिया मात्र खोळंबली आहे. फार्मसी काैन्सिलकडून सुरू असलेल्या इन्स्पेक्शनमुळे प्रवेशप्रक्रिया रखडली आहे. प्रवेश क्षमतेचा तिढा निर्माण झाल्याने प्रवेशाची प्रक्रिया ठप्प झालेली आहे. फार्मसी काैन्सिल ऑफ इंडियातर्फे १० दिवसांपूर्वी परिपत्रक काढत प्रवेश क्षमता गेल्या शैक्षणिक वर्षाप्रमाणे कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर प्रवेशप्रक्रियेला गती मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र तसे झालेले नाही. डीटीईतर्फे राबवल्या जाणाऱ्या प्रक्रियेत डी. फार्मसीच्या प्रवेश अर्जासाठी ३१ आॅक्टोबर ही अंतिम मुदत होती. त्यात आणखी सात दिवसांची वाढ केल्याने आता नोंदणीची मुदत ७ नोव्हेंबरपर्यंत असेल.

वारंवार मुदतवाढ दिली जात असल्याने प्रारूप गुणवत्ता यादी, अंतिम गुणवत्ता यादीसह कॅप राउंड फेऱ्यांचे वेळापत्रकही जाहीर होऊ शकलेले नाही. तर बी. फार्मसी या पदवी अभ्यासक्रमासाठीही वारंवार मुदतवाढ दिली जात असल्याने पदविका अभ्यासक्रमानंतर पदवी अभ्यासक्रमांचेही प्रवेश रखडले आहेत. त्यामुळे प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष वर्ग सुरू होण्यासाठी अजूनही दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे यंदाही शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडणार आहे. विद्यार्थ्यांना प्रथम सत्र व द्वितीय सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल.

बातम्या आणखी आहेत...