आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकताच घडवलेला, आता बिघडलेला अफगाणिस्तान:विकासाच्या वाटेसाठी धडपडणाऱ्या अफगाण मित्रांचा संपर्क तुटतो तेव्हा... टाटाची बस, क्रिकेट मॅच अन् ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ची क्रेझ...

मंदार वैद्य, नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विकासाच्या वाटेसाठी धडपडणाऱ्या अफगाण मित्रांचा संपर्क तुटतो तेव्हा...

नुकताच घडवलेला, आता बिघडलेला अफगाणिस्तान
२००५ पासून अफगाणिस्तानात लोकशाही यंत्रणा, पायाभूत सुविधा व मूलभूत सेवा उभारण्याच्या प्रक्रियेत भारताचा मोठा वाटा होता. त्यातील एका प्रकल्पात मानवतावादी कार्यकर्ता म्हणून कामाचा अनुभव असलेले नाशिकचे आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ मंदार वैद्य यांना २००७ ते २०१६ या काळात आठ वेळा अफगाणिस्तानातील पुनर्निर्माणात सहभागी हाेण्याची संधी मिळाली. सध्याच्या तेथील परिस्थितीनिमित्त अफगाणिस्तानातील जनजीवन व समाजमन यांच्या स्मृतींना त्यांनी दिलेला उजाळा...

सोमवारी दिवसभर काबूल विमानतळावर जिवाच्या आकांताने मायभूमी सोडण्यासाठी पलायन करणाऱ्या अफगाणी नागरिकांची दृश्ये अस्वस्थ करीत होती. त्यात गेल्या दोन दशकांपासून अफगाणिस्तानच्या लोकशाही उभारणीसाठी झटणारे कित्येक डॉ. फईम रहीम आणि डॉ. फवाद माझ्या डोळ्यांसमोरून सरकत नव्हते. त्यांच्यापैकी कुणाचाच संपर्क होत नव्हता, मात्र तेव्हाचे फोटो चाळताना, अफगाणिस्तानाच्या विकासात, उभारणीत भारताचा वाटा किती महत्त्वाचा होता याचे पुरावे हाती लागत होते. काबूलच्या रस्त्यांवर धावणारी टाटांची बस दिसत होती, शांतपणे क्रिकेट खेळणाऱ्या चिमुकल्यांची टीम आठवत होती आणि “क्योंकि सास भी कभी बहू थी’या मालिकेसाठी वेडावलेले अफगाणी प्रेक्षक आठवत होते.

साेमवारी व मंगळवारी टीव्हीवर पाहिलेल्या काबूल विमानतळावर, २००७ मध्ये सर्वप्रथम उतरलो. विमानातील इतर सहप्रवासी पटापट खाली उतरले आणि पुढे इमिग्रेशन पूर्ण करून एक्झिटकडे गेलो तर आमचं सामान अस्ताव्यस्त पडलेलं, बॅगेज बेल्टच नाही, तेव्हाच लक्षात आलं नवी दिल्लीपासून जवळ पण एकदम नवीन परिस्थितीत आलोय. विमानतळावर मनी एक्स्चेंज काउंटरच नाही आणि बाहेर माणसं रांगेने उभे राहून नोटा विकताहेत. विकासाच्या उंबरठ्यावर असलेल्या देशात जाण्याचा पहिलाच योग असल्याने थोडासा घाबरलो. पण ज्या क्षणी मला घ्यायला आलेल्या ड्रायव्हरशी भेट झाली त्या क्षणी भीती संपली.

उंच, धिप्पाड आणि अस्खलित उर्दू-हिंदी बोलणारा. त्याचा भारतीय पाहुण्याला घेऊन जाण्याचा आनंद ओसंडून वाहत होता. नंतर इतर लोकांशी बोलताना भारताने आणि भारतीयांनी संकट काळात कोणतीही अपेक्षा न करता अफगाणिस्तानला मदत केली होती.भारताच्या विशेष धोरणामुळे अनेक अफगाणी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी मिळाल्या. त्या वेळेचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझई यांचं शिक्षणही भारतातच झालेलं. काबूलला प्रकाशमान करण्यासाठी भारतीय इंजिनिअर्सनी उझबेकिस्तानातून काबूलपर्यंत अवघड हिंदुकुश पर्वतरांगांतून २०२ किलोमीटरची विद्युतवाहिनी टाकण्याचं भीमकाय कार्य हाती घेतलं होतं आणि त्या इंजिनिअर्सबद्दलचे प्रेम मी भेटलेल्या प्रत्येक काबूलवासीयाने बोलून दाखवले होते.

आमची कुठेही आबाळ होऊ नये म्हणून सतत लक्ष दिलं जायचं, पण एका गोष्टीबद्दल मात्र आमच्या अफगाण मित्रांनी अजिबात तडजोड केली नाही. आमचं प्रशिक्षणाचं काम वेळेत पूर्ण होण्यासाठी सगळ्यांनी पूर्णवेळ उपस्थित राहणं अपेक्षित होतं. पण आमच्या अफगाण मित्रांना सायंकाळी चारच्या आत घरात अशी सोय हवी होती. त्यांनी विचारलं “हमको घरवालोंके साथ देखना है, आप नहीं देखते क्या इंडियन ड्रामा” आम्ही विचारलं “कौनसा इंडियन ड्रामा?” त्यांनी सांगितलं “ क्याेंकि सास भी कभी बहू थी” असे हे मनोरंजनप्रेमी अफगाणी मित्र. दुसऱ्या वेळी पुन्हा काबूलमध्ये गेलो तेंव्हा मुख्य चौकात ‘बालिकावधू’च भलंमोठं होर्डिंग लागलं होत.

सध्या टीव्हीवर आपण पाहत असलेल्या दृश्यांमध्ये असे अनेक रहमान होते, डॉ. फईम होते. गेली वीस वर्षे स्वतःचा देश उभारण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणारे, अनेक आपल्या घरांचा, आप्तस्वकीयांचा निरोप घेऊन पुन्हा एकदा निर्वासितांचं जीवन जगायला निघालेले. खरं तर काल कबूल विमानतळावर आपण पाहिलेली दृश्ये खूपच प्रातिनिधिक होती, अफगाणिस्तानच्या सीमांवर लोकांचे लोंढे पायी पोहोचताहेत, अनेक परदेशी दूतावासांसमोर रांगा लागल्यात नव्याने आलेल्या युद्धखोर शासनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी!

...आणि त्यांचे विकासाचे स्वप्न पुन्हा उद‌्ध्वस्त झाले
विकासाची ओढ असलेल्या अफगाणी जनतेच्या जीवनात पुन्हा जुनाच अध्याय सुरू होतोय. २००५ नंतर अफगाणिस्तानच्या पुनर्निर्माणाची प्रक्रिया सुरू झाली, लोकशाही व्यवस्था आणि पारंपरिक सामुदायिक निर्णय प्रक्रिया यांची सांगड घालत विकासाचे अनेक कार्यक्रम सुरू झाले होते. १९७८ नंतर वर्षानुवर्षे दुसऱ्या देशात निर्वासितांचं आयुष्य जगणाऱ्या अफगाणी जनतेची दुसरी, तिसरी पिढी पुन्हा मायदेशी परतू लागली, युद्धकाळात नष्ट झालेली शहरं गाव पुन्हा नव्याने डोलू लागली. तरुण पिढीचे अफगाणी मित्र अभिमानाने सांगत होते, “आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात आमची क्रिकेट टीम आहे.” मायदेशी परत आलेल्या या सर्वांच्या डोळ्यात स्वतःच्या देशाचं पुनर्निर्माण करण्याचं स्वप्न काल उद्ध्वस्त झालं.

बातम्या आणखी आहेत...