आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्र विशेष:पती शहीद झाल्यावर वीरपत्नी ‘विजेता’ बनली वीरांगना

नाशिक | सचिन जैन9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरात्र म्हणजे देवीच्या नऊ रूपांचा जागर. त्यांचे नमन करतानाच आजच्या काळात या रूपांना अनुसरून कार्य करणाऱ्या आधुनिक स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाचा हा जागर. नवरात्रोत्सवानिमित्ताने ही विशेष मालिका.

बडगाम येथील अपघातात पती शहीद झाल्याची बातमी नुकतीच पोहोचली होती. कडेवर चिमुकली लेक होती आणि सोशल मीडियावरील चर्चाचर्वणावर ती कडाडली, "सोशल मीडियावरचं युद्ध थांबवा पहिल्यांदा, एवढा जोश असेल तर सीमेवर जाऊन लढा.' ती फक्त बोलून थांबली नाही तर एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच स्वत: भारतीय हवाई दलातील प्रशिक्षण पूर्ण करून फाइंग ऑफिसर या पदावर गेल्या सव्वा वर्षापासून कर्तव्य बजावत आहे. हे सामर्थ्य दाखवले आहे शहीद स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्या वीरपत्नी फ्लाइंग ऑफिसर विजेता यांनी.

प्रतिकूल परिस्थितीत स्वत:चे "विजेता' हे नाव सार्थ करण्याचा पराक्रम त्यांनी करून दाखवला. लेकीच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या शेवटी पतीसोबत शेवटचे बोलणे झाले होते. त्यानंतर निरोप आला तो त्यांच्या शहीद होण्याचाच. प्रसंग पायाखालची जमीन हादरवणारा. पण विजेताने त्याप्रसंगी हिंमत हरली नाही. पुलवामा घटनेवरून सोशल मीडियावर चर्चांचे दळण दळणे सुरू होते. विजेता त्याही परिस्थितीत प्रतिक्रिया देत होती, "युद्ध नकोच, युद्धामुळे काय होतंं ते तुम्हाला माहीत नाही. युद्धाचे परिणाम शहिदांच्या कुटुंबांना विचारा,' त्या दु:खद प्रसंगातही अत्यंत खंबीरपणे उत्तर देणाऱ्या विजेता मांडवगणेंच्या धैर्याची प्रचिती त्याच दिवशी आली होती.

लेकीला वडिलांचा अभाव जाणवू देणार नाही हा संकल्प त्यांनी त्या दिवशी केला. सोबतच संधी मिळाली तर आपणही देशसेवेत रुजू होण्याचा निर्धारही व्यक्त केला होता. त्या फक्त बोलल्याच नाही तर प्रशिक्षणासाठी हैदराबाद येथील सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाचे कठोर प्रशिक्षण पूर्णही केले आणि सध्या त्या देवळाली एअर पोस्ट स्टेशनवर फाइंग ऑफिसर पदावर सेवा बजावत आहेत. पतीला वीरमरण आल्याच्या दु:खाचा दगड महिना-दोन महिन्यांनी त्यांनी बाजूला सारला आणि त्यांच्या जागेवर आपल्याला संधी मिळावी यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा सुरू केला. अखेरीस त्यांच्या निश्चयाला यश आले आणि जून २०१९ मध्ये त्यांची हवाई दलात प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली. त्याच वेळी वेदितेलाही नाशिकमध्ये प्री - स्कूलमध्ये घातले होते. एका बाजूला आईचं काळीज तर दुसऱ्या बाजूला वीरपत्नी म्हणून केलेला निश्चय या भावनिक कात्रीत त्या सापडल्या. त्याच वेळी शहीद निनाद यांचे आईवडील सुषमा आणि विजय मांडवगणे आणि विजेतांच्या आईवडिलांच्या आश्वासक साथीनं त्यांचा निर्णय सोपा झाला. जून २०२० मध्ये त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आणि जुलैमध्ये सेवेत रुजू झाल्या. दृढ निश्चय, खंबीर मन आणि कोणत्याही संकटात कणखरपणे चिकाटीने उभे राहण्याची ताकद हेच गुण यात उपयोगी पडत असल्याचे त्या मानतात.

रुप दुसरे ब्रह्मचारिणी
महिमा : शौर्य आणि सामर्थ्याचे प्रतीक असलेले हे रूप. पतीसाठी कठोर तपश्चर्या करणाऱ्या देवीचे.

बातम्या आणखी आहेत...