आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्शन सुविधा बंद:शेंदूर लेपन काढल्यानंतर श्री सप्तशृंगी भगवतीची मूर्ती अतिप्राचीन रूपात!

कळवणएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सप्तशृंगी देवीचे मूर्ती स्वरूप संवर्धन व देखभाल प्रक्रियेसाठी दर्शन सुविधा बंद करण्यात आली हाेती. २१ जुलैपासून सुरू असलेले काम पूर्ण झाले आहे. येत्या तीन दिवसांत संपूर्ण धार्मिक विधी व पितृपक्षात १६०० देवी अथर्वशीर्ष पाठांचे अनुष्ठान नवरात्रीपूर्वी होणार आहेत. त्यानंतर नवरात्रीच्या पहिल्या माळेला (२६ सप्टेंबर) घटस्थापनेपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे. विशेष म्हणजे कित्येक वर्षांपासून सप्तशृंगी भगवतीला लावले गेलेले शेंदूर लेपन शास्त्रोक्त पद्धतीने काढण्यात आल्याने देवी मूळ रूपात दिसू लागली आहे. तिचे अतिप्राचीन व स्वयंभू रूप दिसू लागले आहे.

गेल्या दीड महिन्यापासून सप्तशृंगी मंदिर मूर्ती संवर्धन कामामुळे दर्शनासाठी बंद आहे. नियोजित वेळेनुसार ५ सप्टेंबर रोजी मंदिर भाविकांसाठी खुले होणार होते. काम पूर्ण होऊन काही धार्मिक विधी, पूजापाठ होणे आवश्यक असल्याने मंदिर खुले करणे अशक्य असल्याबाबत विश्वस्त संस्थेने पत्रकार परिषदेत माहिती दिली. सप्तशृंगी देवीच्या मूळ स्वरूपाच्या संवर्धनासाठी विश्वस्त संस्थेच्या वतीने वेळोवेळी शासनाच्या पुरातत्त्व विभाग, आयआयटी पवई (बॉम्बे) यासह पुरातत्त्व विभागामार्फत अधिकृत असलेल्या अजिंक्यतारा कन्सल्टन्सीमार्फत (नाशिक) केलेली प्रत्यक्ष निरीक्षणे, अहवालानुसार जिल्हा प्रशासनाशी योग्य ती चर्चा व समन्वय साधून मूर्ती संवर्धन व देखभाल प्रक्रियेचे काम सुरू करण्यात आले. श्री भगवतीच्या स्वरूपावरील मागील कित्येक वर्षांपासून लावलेला शेंदूर लेपनाचा भाग (कवच) हा धार्मिक व शास्त्रोक्त पद्धतीने काढण्यात आला. त्यामागे श्री सप्तशृंगी भगवतीची अतिप्राचीन व स्वयंभू स्वरूपातील मूर्ती समोर आली. विलोभनीय व स्वयंभू स्वरूप लवकरच सर्वसामान्य भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध होणार आहे. १० सप्टेंबरपासून पितृपक्ष असल्यामुळे भाविकांना दर्शन उपलब्ध करून देणे शक्य नाही. शारदीय नवरात्र सुरू होण्यापूर्वी धार्मिक विधी पूर्ण होणे आवश्यक आहे.

धार्मिक पीठांतील विद्वानांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक विधी संस्थानतर्फे पितृपक्षापूर्वी आवश्यक सर्व पूजाविधी करून नवरात्रीच्या पहिल्या माळेला सोमवारपासून (२६ सप्टेंबर) श्री सप्तशृंगी देवीच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध धार्मिक पीठांतील विद्वान तसेच श्रीक्षेत्र काशीचे पं. गणेश्वरशास्त्री द्रविड, श्रीक्षेत्र नाशिक येथील स्मार्त चूडामणी पं. शांतारामशास्त्री भानोसे व श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथील पुरोहित संघाच्या मार्गदर्शनाप्रमाणे धार्मिक विधी हाेणार आहेत.

तीन दिवसांत होणार पूजाविधी श्री भगवती मंदिरात सहस्र कलश महास्नपन विधी, संप्रोक्षण विधी, उदकशांती, शांतिहोम या धार्मिक पूजा तसेच संपूर्ण पितृपक्षात १६०० देवी अथर्वशीर्ष पाठांचे अनुष्ठान नवरात्रीपूर्वी महाराष्ट्रातील तज्ज्ञ पुरोहितांकडून करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...